पुणे : कसबा पेठेत रासनेंविरुद्ध काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर? | पुढारी

पुणे : कसबा पेठेत रासनेंविरुद्ध काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ मतदारसंघासाठी काँग्रेसने माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांचे नाव उमेदवार म्हणून जवळपास निश्चित केले आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याची घोषणा झालेली नव्हती. या मतदारसंघात धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यातच थेट लढत होईल. महाविकास आघाडीतर्फे कसबा पेठेतून काँग्रेस, तर चिंचवड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह तीन माजी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसतर्फे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात येत आहे. सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री यांच्यासह प्रदेश आणि शहरातील पदाधिकारी मोठ्या
संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी पटोले यांच्यासह शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मतदारसंघाचे प्रभारी आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस भवनात थांबून आज सायंकाळी तयारीवर देखरेख ठेवली.

काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्याची मिरवणूक सोमवारी सकाळी कसबा गणपती मंदिरापासून निघणार असून, बाबू गेनू मंडळाजवळ त्यांची सभा होणार आहे. त्याच वेळी भाजपचे उमेदवार रासने हेही कसबा गणपती मंदिरापासून मिरवणुकीने अर्ज दाखल करण्यास निघणार आहेत. त्यांच्यासमवेत भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे आमदार व स्थानिक नेते असतील.
दरम्यान, महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रशीद शेख यांनी रविवारी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. ते विधानसभेच्या गेल्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्या वेळी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार रमेश बागवे यांचा पराभव झाला होता. दुसर्‍या बाजूला बागवे यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. बागवे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी थेट काही सांगण्यास नकार दिला. सध्या काँग्रेसमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे काही जण भेटल्याचे त्यांनी मान्य केले. कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडी घडत आहेत.

धंगेकर चार वेळा नगरसेवक
रवींद्र धंगेकर चार वेळा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले असून, त्यापूर्वी त्यांच्या वॉर्डातून एकदा त्यांची बहीण नगरसेविका झाल्या होत्या. शिवसेनेचे नगरसेवक झाल्यानंतर ते दोनदा मनसेचे नगरसेवक झाले. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. मनसेतर्फे त्यांनी दोन वेळा कसबा पेठ मतदारसंघातून भाजपचे गिरीश बापट यांच्याविरुद्ध लढत दिली. या वेळी महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्रितरीत्या त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे कसबा पेठेतील लढत अटीतटीची ठरणार

निवडणूक आम्हाला जिंकायची आहे : पटोले
कसबा पेठेतून काँग्रेसचा उमेदवार दिला जाणार असून, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी या निवडणुकीत लक्ष देत आहे. ही निवडणूक आम्हाला जिंकायची आहे. रात्री उशिरा उमेदवारी जाहीर केली जाईल. सोमवारी अर्ज दाखल केला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पटोले यांना फोन केल्याची माहिती दिली. एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू
झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली जाते. त्यामुळे या पोटनिवडणुकीत उमेदवार दिला जात नाही. ही आपली परंपरा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी पटोले यांना सांगितले आहे. त्यावर आपण चर्चा करू, असे सांगितले. मात्र, टिळक कुटुंबातील उमेदवार न देता भाजपने टिळक कुटुंबाबाहेरील उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेस कसबा पेठ निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे स्पष्ट केले. चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढत असून, महाविकास आघाडी म्हणून आम्ही राष्ट्रवादीसोबत आहोत.
सरकार म्हणून तुम्ही बरोबर वागत नाही. सत्तेत आल्यापासून तुम्ही आमची कामे थांबवली आहेत. यापूर्वी अशी कामे थांबवली गेली नव्हती, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.

दिग्गज नेते उपस्थित राहणार 

काँग्रेसने रविवारी (दि.5) उशिरापर्यंत कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला नव्हता. मात्र, सोमवारी (दि.6) सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. तर, भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे सोमवारीच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे या एकाच दिवशी दोन्ही बाजूने शक्तिप्रदर्शन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवार सोमवारी सकाळी 9 वाजता कसबा गणपतीचे दर्शन घेणार आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत. भाजप-शिवसेना, रिपाइं युतीचे उमेदवार हेमंत रासने हेदेखील सकाळी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष योगेश मुळीक, शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे, अजय भोसले, रिपाइंचे शैलेंद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसकडून ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे आणि बाळासाहेब दाभेकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.

Back to top button