

नगर: दुसऱ्या विवाहाचा आधार घेत पत्नीला आर्थिक जाळ्यात ओढून तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पतीवर शारीरिक व मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार महिलेचा पहिला विवाह मोडीत निघाल्यानंतर ओळखीच्या एका व्यक्तीने तिला लग्नाचे आमिष दाखवले. पहिल्या पतीपासून असलेल्या मुलाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन देत त्या व्यक्तीने महिलेचा विश्वास संपादन केला.
विवाहानंतर काही दिवसांतच व्यवसायाचे कारण सांगून त्या व्यक्तीने महिलेच्या नावावर विविध बँकांमधून गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि सोने तारण असे सुमारे 30 लाख रुपये उकळले. काही काळानंतर महिला गरोदर असतानाच संशयित पतीने किरकोळ कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली आणि तिला सोडून तो मूळ गावी निघून गेला.
कर्जाचे हप्ते थकल्याने विचारणा केली असता, त्याने महिलेला मारहाण व शिवीगाळ करत मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. भरोसा सेलच्या माध्यमातून समझोत्याचा प्रयत्न होऊनही पतीने नांदवण्यास नकार दिल्याने अखेर पीडित महिलेने पोलिसांकडे दाद मागितली आहे.
हक्काचे घर गहाण पडल्याने आणि पतीकडून कोणताही आर्थिक आधार मिळत नसल्याने सध्या या महिलेवर व तिच्या दोन मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे.