

नाशिक : भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी असली तरी १२२ जागांवर कमळ फुलवायचे आहे. कोणाची बदनामी न करता इच्छूक म्हणून प्रचार करा. अद्याप कोणाचीही उमेदवारी फिक्स नाही. भाजपची निवडणूक समिती, कोअर कमिटी आणि सर्वेक्षणातूनच अंतिम उमेदवार यादी निश्चित होते. कोण एक जण आपल्याला उमेदवारी देईल अशा भ्रमात राहू नका, अशा शब्दांत इच्छूकांना कानपिचक्या देत यंदाची निवडणूक भाजपच्या ऐतिहासिक विजयाची ठरेल, असा विश्वास भाजपच्या निवडणूक प्रमुख आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी व्यक्त केला.
आमदार राहुल ढिकले यांना हटवून निवडणूक प्रमुखपदी आमदार फरांदे यांची नियुक्ती भाजपने केल्यानंतर आ. फरांदे यांनी शुक्रवारी (दि.१९) भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत आ. फरांदेचा पक्षातर्फे सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आमदार फरांदे यांनी इच्छुकांना कानपिचक्या दिल्या. महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे सर्वाधिक १०६७ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. इच्छूुकांचा सर्वाधिक कल भाजपकडे असल्याने चांगले दिवस आल्याचे नमूद करताना इच्छूक भरपूर असले तरी कोणीतरी एक जण आपल्याला उमेदवारी देईल अशा भ्रमात कोणी राहू नका, असा इशारा त्यांनी दिला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी १०० प्लसचा नारा दिला. त्यामुळे हा नारा पूर्ण करण्यासाठी एकजुटीने काम करायचे आहे. इच्छूक म्हणून प्रचार करा. पण दुसऱ्या इच्छुकाची बदनामी करू नका. निवडणुकीत कोणालाही उमेदवारी मिळो, सर्वांनी एकत्रित काम करा असे आवाहन फरांदे यांनी केले.
युतीबाबत वरीष्ठ आमचे मत घेतील
शिवसेनेसोबत युती करायची की नाही हा निर्णय वरिष्ठ घेतील. परंतु, युतीबाबत नेते आमचेही मत ऐकूण घेतील असा दिलासा आ. फरांदेनी यावेळी इच्छुकांना देण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीत ३१ प्रभागात १०० टक्के भाजप असा नारा असणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रित मिळून काम करा असा सल्लाही त्यांनी दिला.
टोमणे अन् टोलेबाजी
या बैठकीत टोमणे अन् टोलेबाजी चांगलीच रंगली. आमदार फरांदेच्या नेतृत्वात पक्षाला गतवेळेपेक्षा चांगले यश मिळेल, असा चिमटा ज्येष्ठ नेते विजय साने यांनी काढला. आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचे फरांदे यांना सांगितले असल्याचा टोमना लक्ष्मण सावजी यांनी मारला. यावर आ. फरादेंनी मी सायलेंट मोडवर असल्याचे उत्तर दिले. फरांदे यांना चांगल्या सहाय्यकाची आवश्यकता आहे. याबद्दल मी त्यांना फोनवर सांगितल्यावर, त्यांनी होकार दिला आहे, असे सावजी यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.
आमदार ढिकलेंची अनुपस्थिती
निवडणूक प्रमुखपदावरून हटवल्याने नाराज असलेले आमदार राहुल ढिकले बैठकीस अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीची चर्चा रंगली होती. बैठकीस शहराध्यक्ष सुनील केदार, आमदार सीमा हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, लक्ष्मण सावजी, महिला शहराध्यक्ष स्वाती भामरे, काशीनाथ शिलेदार, सुधाकर बडगुजर, नीलेश बोरा, प्रशांत जाधव उपस्थित होते.