

US airstrikes Syria
वॉशिंग्टन : सीरियामध्ये दोन अमेरिकन सैनिकांच्या झालेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने शुक्रवारी मध्यरात्रीपासून सीरियातील इस्लामिक स्टेट (ISIS) च्या दहशतवाद्यांविरोधात मोठी लष्करी कारवाई सुरू केली आहे. 'ऑपरेशन हॉकआय स्ट्राईक' असे नाव देण्यात आलेल्या या मोहिमेद्वारे अमेरिकेने सीरियातील दहशतवादी तळांना लक्ष्य केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईला "नराधम दहशतवाद्यांविरुद्ध घेतलेला अत्यंत गंभीर सूड" असे म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणाले की, "सीरियात इसिसच्या दहशतवाद्यांनी आमच्या शूर अमेरिकन देशभक्तांची निर्घृण हत्या केली. मी वचन दिल्याप्रमाणे, या क्रूर कृत्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना आता त्याची किंमत मोजावी लागेल. सीरिया हा रक्ताने माखलेला भूभाग असला, तरी इसिसचा नायनाट झाल्यास या देशाला उज्ज्वल भविष्य आहे."
या मोहिमेत अमेरिकेने आपल्या हवाई दलाची मोठी शक्ती पणाला लावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत F-15 ईगल फायटर जेट्स, A-10 थंडरबोल्ट अटॅक एअरक्राफ्ट आणि AH-64 अपाचे हेलिकॉप्टर्सचा वापर करून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर बॉम्बवर्षाव करण्यात येत आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या कारवाईला "ही युद्धाची सुरुवात नाही, तर हा सूड आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका आपल्या लोकांच्या रक्षणासाठी कधीही डगमगणार नाही आणि मागे हटणार नाही," असे म्हटले आहे.
१३ डिसेंबर रोजी सीरियाच्या वाळवंटात झालेल्या हल्ल्यात आयोवा नॅशनल गार्डचे दोन सदस्य आणि अमेरिकेचा एक नागरी दुभाषिक मारला गेला होता. ट्रम्प प्रशासनाने या हल्ल्यासाठी इस्लामिक स्टेटला जबाबदार धरले होते. या घटनेमुळे अमेरिकेत संतापाची लाट होती. या हल्ल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ट्रम्प प्रशासनाने सीरियन सुरक्षा दलांच्या मदतीने हा मोठा प्रतिहल्ला चढवला आहे. सध्या पूर्व सीरियामध्ये इसिस विरुद्धच्या मोहिमेसाठी शेकडो अमेरिकन सैनिक तैनात आहेत.