खुनाचा प्रयत्न करून पळणार्या आरोपीस अटक ; वडगाव मावळ पोलिसांची कारवाई
वडगाव मावळ : पुढारी वृत्त्तसेवा : नागाथली येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने डोक्यात वर करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून मुंबईमध्ये पळून चाललेल्या आरोपीला बेड्या ठोकण्यात वडगाव मावळ पोलिसांना यश आले.
गणेश गणपत शिंदे (रा.नागाथली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने संदीप ज्ञानेश्वर तिकोणे (वय.28, रा.नागाथली) यास गुरुवार दि. 1 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तिकोने हे त्याचे हिंदवी चायनीज सेंटरमध्ये जेवण बनवीत असताना दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी शिंदे याने त्याचे हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादीचे डोक्यात पाठीमागून वार करुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी शिंदे हा घटनास्थळावरून मुंबईला पळून चाललेला होता, याबाबत त्याचा पाठपुरावा करून तो प्रवास करत असताना कर्जत जिल्हा रायगड या ठिकाणी लोकलने मुंबईला जात असताना त्याला सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष जाधव, पोलिस हवालदार श्रीशैल कंटोळी, शशिकांत खोपडे, संदीप वंडाळे यांनी मोठ्या शिताफिने पकडून अटक केली आहे.