Kavalapur murder News
कवलापुरात तरुणाचा जमावाकडून खून झाला. Pudhari News Network

कवलापुरात हल्लेखोर तरुणाचा जमावाकडून खून

सहाजणांना अटक, सहाजण पसार; गावात तणावपूर्ण शांतता
Published on

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांच्यावर कोयत्याने हल्ला करणार्‍या संशयित तरुणाचा जमावाने बेदम मारहाण करीत खून केला. संकेत ऊर्फ शुभम चन्नाप्पा नरळे (वय 17, रा. हनुमान मंदिराजवळ, साखर कारखाना परिसर, सांगली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सांगली ग्रामीण पोलिसांनी आठ तासात तपास करीत सहा संशयितांना अटक केली आहे, तर तिघांची नावे निष्पन्न झाली असून इतर सहाजण पसार आहेत. गजानन तावदारकर, सचिन ऊर्फ पांडुरंग अरुण पाटील, दीपक माळी, वैभव तोडकर, विवेक ऊर्फ गोट्या पाटील, विशाल विलास पाटील अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत, तर महेश मोहन पाटील, पप्या मोनाप्पा पाटील, संंतोष ऊर्फ बंडा नाईक या तिघांची नावे निष्पन्न झाली आहेत. याप्रकरणी मृत संकेतचा भाऊ ओंकार चन्नाप्पा नरळे याने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी 24 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता मृत संकेत नरळे, जोतिराम शिवाजी माने (वय 22, रा. कवलापूर) व एक अल्पवयीन मुलगा अशा तिघांनी सिद्धेश्वर चौकात तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. यात पाटील गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचे समजताच चौकात मोठा जमाव जमा झाला. जमावाने हल्लेखोरांचा शोध घेतला. यात संकेत जमावाच्या तावडीत सापडला. इतर दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. जमावातील तरुणांनी संकेतला बेदम मारहाण केली. त्याला भानुदास पाटील यांच्या तुकाई मळा येथील शेतात घेऊन गेले. तिथेही मारहाण करण्यात आली. संकेतला शेतातच टाकून हल्लेखोर पसार झाले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे, सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश रामाघरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत ग्रामस्थांनी भानुदास पाटील यांना सांगलीच्या खासगी रुग्णालयात हलविले होते. पोलिसांनी संकेतचा शोध सुरू केला. त्याला शेतात नेल्याचे समजताच पथकाने तिकडे धाव घेतली. संकेतला ताब्यात घेत उपचारासाठी तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी पहाटे संकेतचा मृत्यू झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news