वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: मागील बारा दिवस गॅलक्सी रुग्णालयात उपचार घेत असलेले मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील आज (दि.२५) अंतरवाली सराटी येथील आंदोलन स्थळी दाखल झाले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शेकडो वाहनांच्या ताफ्यासह ते अंतरवालीत दाखल झाले. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. गावातील महिलांनी औक्षण करून त्यांचे जंगी स्वागत केले.
मराठा कुणबी एकच आहेत, हे मी सिद्ध करून दाखवतो. मराठ्यांना कुणीही ओबीसी आरक्षणापासून रोखू शकत नाही. सातत्याने लढावे लागेल. तेव्हाच आरक्षण मिळेल, आधी मुंबईला चक्कर झाली. आता पुन्हा दुसरी चक्कर मारू. आधी सरकारचे ऐकून मुंबई सोडली आता, तुम्ही म्हणता तेव्हाच मुंबई सोडू, असे म्हणत त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा मुंबईत धडक देण्याचा इशारा यावेळी सरकारला दिला.
ते पुढे म्हणाले की, १३ जुलैला मराठा समाजाची बैठक घेऊन विधानसभेच्या २८८ जागा लढवायच्या की पाडायच्या, हे ठरवले जाईल. आमच्या व्याख्येनुसार सगेसोयरे कायदा करून अंमलबजावणी करा, अन्यथा आम्हाला विधानसभेच्या तयारीला लागावे लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिला.
छगन भुजबळ याला जातीय दंगली घडवायची आहे. पण आपल्याला घडवू द्यायची नाही. त्याच दंगलीचे स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. हा दंगल घडवून आणेल आणि पळून जाईल. ओबीसी आणि आपण भांडायचे नाही. आपण शांत राहायचे. वाद होईल, असे कोणतीही कृती होऊ देवू नका. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी भुजबळ यांच्यावर कंट्रोल ठेवावा, भुजबळ तू कोणत्याही पक्षात जा. तू ज्या पक्षात जाशील, मी त्यांच्याही जागा पाडून टाकीन, असा इशाराही त्यांनी भुजबळ यांच्यासह नेत्यांना दिला. मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर मुस्लीम आणि धनगरांना आरक्षण कसे मिळत नाही, ते मी बघतोच, असे जरांगे म्हणाले.