Sangli News : राख करणारी ड्रग्जची किक

नशेच्या गोळ्यांचाही व्यापार वाढला
Sangli News :  राख करणारी ड्रग्जची किक
Published on
Updated on

सांगली : सांगली-मिरज मेडिकल हब म्हणून जगभर ओळखले जाते. त्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणासाठी देश-विदेशातून मुले सांगलीत येतात. आई-वडिलापासून दूर असलेली, अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेली तरुण मुले व्यसनाच्या आहारी जातात. नेमके हेच हेरून या मुलांना अमली पदार्थांच्या नादी लावले जात आहे. पुण्या-मुंबईतील हा ट्रेंड आता सांगलीसारख्या निमशहरी भागातही येऊ लागला आहे.

गांजाची सर्वाधिक खरेदी-विक्री

जिल्ह्यात गांजाची सर्वाधिक खरेदी-विक्री होत आहे. तो दर महिन्याला पकडला जातो. गेल्याच आठवड्यात सांगली शहर पोलिसांनी चार किलो गांजा पकडला होता. 2023 मध्ये जिल्ह्यातून 74 लाख 12 हजार रुपये किमतीचा 553 किलो 757 ग्रॅम गांजा पकडला होता. जानेवारी ते मे 2024 पर्यंत 9 लाख 79 हजार रुपये किमतीचा 42 किलो 654 गॅम गांजा पकडला.

नशेच्या गोळ्यांचा व्यापार

गांजाखालोखाल जिल्ह्यात नशेच्या गोळ्यांचा (नाईट्रावेट) व्यापार वाढला होता. औषध दुकानांतून या नशेच्या गोळ्या सहज उपलब्ध होत होत्या. त्याकडे तरुणाई मोठ्या प्रमाणात वळली होती. मध्यंतरी पोलिस प्रशासन, एलसीबीने छापेमारी करीत नशेच्या गोळ्या पकडल्या होत्या. 2023 मध्ये 558, तर 2024 मध्ये 720 गोळ्या जप्त केल्या होत्या. औषध दुकानदारांनाही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नाईट्रावेट गोळ्या देण्यास बंधन घातले.

नशेसाठी कफ सिरप, व्हाईटनर

गांजा, नशेच्या गोळ्यांसह तरुणांकडून कफ सिरप, व्हाईटनर, व्हेंसेडील, पॉलिश लिक्विडचाही वापर केला जातो. या सर्व वस्तू सहज उपलब्ध होतात. व्हाईटनरचा वापर महाविद्यालयीन तरुणांत वाढला आहे. बाजारात इलेक्ट्रिक सिगारचीही फॅशन आली आहे. त्यातूनही अमली पदार्थांचा विळखा पडत आहे.

500 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

पुणे, ठाण्यानंतर सांगली जिल्ह्यात एमडी ड्रग्जचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्याचे आढळून आले आहे. तीन महिन्यांपूर्वी कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे मुंबई गुन्हे शाखेने छापा टाकून एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. यावेळी पोलिसांना 245 कोटींचे एमडी ड्रग्ज मिळून आले होते. तत्पूर्वी कुपवाड येथेही तीनशे कोटींचे एमडी ड्रग्ज मिळाले होते. त्याच्या एक ग्रॅ्रमची किंमत दोन ते तीन हजार रुपये आहे. ड्रग्ज पॅडलरकडून सांगली जिल्ह्यातील निर्मनुष्य ठिकाणी कारखाना उभा करून एमडी ड्रग्जचे उत्पादन केले जात होते. पुणे, मुंबईनंतर सांगलीतही ड्रग्ज रॅकेट सक्रिय असल्याचे उघड झाले होते.

कोठून येतात अमली पदार्थ?

सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात गांजाची शेती केली जायची. तेव्हा गांजा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात उपलब्ध होत होता. कालांतराने गांजाची शेती कमी झाली. आता कर्नाटकचा सीमावर्ती भाग, उत्तर भारतातून गांजा जिल्ह्यात येतो. प्रवासी बस, ट्रक, रेल्वे याशिवाय अन्य मार्गानी अमली पदार्थ जिल्ह्यात आणले जातात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news