सातारा : मुलीचा विनयभंग करत युवकाने केली मारहाण
![नाशिक](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2022/04/20103505/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97.jpg)
सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी अकरा वर्षीय मुलगी सरपण आणायला गेल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. मुलीने प्रतिकार करताच संशयिताने मुलीला मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली. दरम्यान, संशयित आरोपी अरुण गायकवाड याला पोलिसांनी अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी, पीडित मुलगी ही सातारा तालुक्यातील एका गावात राहण्यास असून ती दि. 21 रोजी तिच्या भांवडांसह सरपण आणण्यासाठी निघाली होती. सरपण घेवून घरी परत येत असताना पाठीमागून आलेल्या संशयिताने तिच्या डोक्यावरील सरपणाची मोळी खाली पाडून तिचे तोंड हाताने दाबत तिला शेजारच्या ऊसाच्या शेतात ओढून नेहे. यावेळी संशयिताने तिच्यासोबत झोंबाझोबी सुरु केल्याने पीडित मुलीने प्रतिकार करत जोराचा हिसका मारत स्वत:ची सुटका करुन घेतली. मुलगी संशयिताच्या तावडीतून सुटल्यानंतर ती पळून जात असताना संशयिताने तिला पाठीमागून दगड मारल्याने मुलगी जखमी झाली. यावेळी संशयिताने पुन्हा मुलीला जावून डोळ्यावर बुक्कमी मारली. यात मुलीला चक्कर आल्याचे पाहून संशयिताने तेथून पळ काढला. दरम्यान, पीडित मुलगी जखमी अवस्थेत घरी आल्यानंतर तिने कुटुंबियांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावेळी कुटुंबियांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशसानाने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मुलगीकडून माहिती घेतली. तपासाला सुरुवात झाल्यानंतर संशयिताला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.