धुळे तालुक्यातील तरवाडे गावाजवळ अंडरपास करणे, मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने-कापडणे चौफुलीवर उड्डाणपूल किंवा अंडरपास करणे, मुकटी-वेल्हाणे रस्त्यावर अंडरपास तर फागणे-काळखेडे बायपास रस्त्यावर अंडरपास करणे अशा विविध ठिकाणी येणार्या रस्त्यांच्या समस्या आणि रस्ते विकासाच्या कामांच्या मागणीसाठी धुळे लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ. शोभा बच्छाव आणि धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी दिल्लीत रस्ते वाहतूक व महामार्गचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी ना. गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्यांशी तत्काळ दूरध्वनीवर संपर्क साधून धुळे तालुक्यातील रस्ते विकासाची कामे त्वरीत मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.
धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खा डॉ.शोभाताई बच्छाव आणि धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी आ.कुणाल पाटील यांच्याकडे धुळे तालुक्यातील महामार्गावरील विविध गावातील ग्रामस्थांनी रस्त्यांबाबत समस्या सोडविण्याची मागणी केली होती. त्यानुसार आ.कुणाल पाटील यांनी ना.नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करतांना सांगितले कि, धुळे तालुक्यांतर्गत सलेल्या महामार्गाची कामे सुरु आहेत. या महामार्गांवरील गावांतील शेतकरी,ग्रामस्थ आणि वाहनधारकांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी अंडरपास,उड्डाणपूल,सर्व्हिस रोड इत्यादी आवश्यक असलेल्या कामांचा समावेश नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. अनेक वेळा अपघातामुळे प्राणहानीही झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी विविध कामांची मागणी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.52(जूना 211) तरवाडे येथे अंडरपास करणे आवश्यक आहे. शिरुड ते विंचूर फाटापर्यंत सर्व्हिस रोडची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. धुळे-सोलापूर महामार्गावर जुनवणे येथील विद्युत सबस्टेशनलगत उड्डाणपूल किंवा अंडरपास करण्यात यावा, तसेच मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने कापडणे चौफुलीवर उड्डाणपूलाचीही मागणी प्रकर्षाने होत आहे. धुळे तालुक्यातील भिरडाई शिवारात रा.म.6 वरील मुकटी-वेल्हाणे रस्त्यावर अंडरपास करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे फागणे-काळखेडे रस्त्यावरही अंडरपास करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. धुळे तालुक्यातील मौजे नेर ग्रामपंचायत हद्दीतील नूरनगर गावाकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशा विविध कामांची मागणी आ.पाटील यांनी केली आहे.
यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी तेथूनच ना.नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे नागपूर विभागीय अधिकारी राकेशसिंग यांच्याशी दूरध्वनीव्दारे संपर्क साधून सूचना केल्या. जळगाव,धुळे प्रकल्प संचालकांशी चर्चा करुन आमदार-खासदारांनी सूचविलेली कामे त्वरीत मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात याव्या, असे आदेश ना.गडकरी यांनी राकेशसिंग यांना दिले. दरम्यान ना.नितीन गडकरी यांच्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी आमचे विविध विषय समजून घेत रस्ते विकासाची कामे मार्गी लावण्याचे आदेश आपल्या विभागाला केल्याने समाधान वाटले. त्यामुळे खा.डॉ.शोभाताई बच्छाव आणि आ.कुणाल पाटील यांनी ना.गडकरी यांचे आभार मानले.