Doda Encounter | जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये चकमक, २ दहशतवादी ठार
पुढारी ऑनलाईन डेस्क
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील जंगल परिसरात बुधवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. पीटीआय वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, डोडा जिल्ह्यात ११ आणि १२ जून रोजी झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांनंतर लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) तसेच पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम हाती घेतली. या शोध आणि घेराबंदीच्या मोहिमेदरम्यान सकाळी ९.५० च्या सुमारास गंडोह भागातील बजाड गावात दहशतवादी आणि सुरक्षा जवान यांच्या चकमक सुरु झाली. यात २ दहशतवादी ठार झाले.
११ जून रोजी दहशतवाद्यांनी चत्तरगल्ला येथे एका संयुक्त चेक पोस्टवर हल्ला केला होता. त्यात ६ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. तर दुसऱ्या दिवशी गंडोह भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक पोलिस जखमी झाले होते.
या दहशतवादी हल्ल्यांनंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी ऑपरेशन तीव्र केले. तसेच जिल्ह्यात घुसखोरी करून कार्यरत असलेल्या ४ पाकिस्तानी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी प्रत्येकी ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते.
दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर
सुरक्षा दलांच्या मदतीने पोलिसांनी सिनू पंचायत गावात शोध मोहीम सुरु केली. या दरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. पण त्याला चोख प्रत्युत्तर दिले, असे अधिकाऱ्याने सांगितले. अद्याप या ठिकाणी गोळीबार सुरूच आहे, असेही ते म्हणाले.

