नाशिकमध्ये 'दुभंगलेल्या नात्याने अन् वादाने दुभंगले देखणे वाडे'

विवादांमुळे नाशिकमधील ऐतिहासिक वाड्यांचे वैभव गमावले
Nashik Old Wada
नाशिक येथील वाडे दुभंगलेल्या नात्याने वाडेही दुभंगल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.(छाया : गणेश बोडके)

पंचवटी (नाशिक) : गणेश बोडके

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक वाडे व घरे कोसळण्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. त्यासाठी दरवर्षी नाशिक महानगरपालिकेकडून धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन व दक्षता म्हणून संबंधित घरे व वाडे मालकांनी त्वरित दुरुस्ती करावी अथवा घर तातडीने रिकामी करण्याबाबत सूचना व नोटिसा दिल्या जातात. मात्र वाड्याच्या मालकी हक्काबाबत कुठे भावा - भावांमध्ये, तर कुठे भाडेकरू - मालकांमधील वाद सुटत नाही. तर अनेक ठिकाणचे वाद न्यायालयात पोहोचल्याने यात मनपाला हस्तक्षेप करता येत नसल्याने परिस्थिती जैसे थे आहे. यामुळे हे वाडे ना रिकामे होत आहेत, ना त्यांची दुरुस्ती होत आहे. परिणामी दुभंगलेल्या नात्याने वाडेही दुभंगल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Nashik Old Wada
नाशिक : देवळालीतील आरोग्यधाम, बंगल्यांची भुरळ पर्यटकांना

जुने नाशिक, पंचवटी, रविवार कारंजा, अशोक स्तंभ, दहीपूल या भागांत अनेक वाडे असून, ते नाशिकच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. तीन - चार मजली वाडे हे नाशिकचे आजही भूषण आहे. परंतु अनेक वाड्यांच्या वास्तू या काळाच्या ओघात खिळखिळ्या होत आहेत. असे वाडे, घरे रिकामी करण्याच्या नोटिसा वाडेमालकांच्या नावाने दिल्या जात असल्याने वाड्यामध्ये भाडेकरू असलेल्या व्यक्तींना त्याच्याशी काहीही देणे-घेणे नसते किंवा कारवाईची भीती नसते. अनेक वाडे व घरांमध्ये राहात असलेले भाडेकरू व वाडामालक यांच्यामध्ये मालकी हक्क, आज रोजी असलेले भाडे व ते रिकामे करण्यावरून वाद सुरू असतात. म्हणून धोकादायक वाडे रिकामे होत नाहीत व मनपाकडून नोटीस देणे सोडून कुठलीही कारवाई होत नाही.

मनपामार्फत धोकादायक वाडे व घरांबाबत नोटीस देताना अ, ब, क अशी वर्गवारी करण्यात आली आहे. यात अतिधोकादायक, धोकादायक, दुरुस्ती होऊ शकतील, असे वर्गीकरण करून त्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. मनपाच्या १५ दिवसांच्या नोटिसीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची नळजोडणी तसेच वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. पंचवटीतील जवळपास २०३ धोकादायक घरांची पाहणी करत संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच पूररेषेत असणाऱ्या 71 घरमालकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

फक्त पन्नास रुपये भाडे...

धोकादायक वाडे, घर रिकामे करताना मालकांची दमछाक होताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी जुने भाडेकरू असल्याने त्यांना घर भाडे अतिशय कमी म्हणजे २५, ५०, १०० रुपयांमध्ये असल्याने अनेक भाडेकरू घर रिकामे करण्यास तयार नाही. तर अनेक भाडेकरू आता आपलाच मालकी हक्क असल्याबाबत सांगत आहेत.

धोकादायक घरे व वाड्यांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. अशा वाडे व घरांबाबत न्यायालयाची परवानगी घेऊन नोटीस देत मनपा ते रिकामे करू शकते. मात्र ज्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने स्थगिती दिली आहे, असे वाडे व घरे मनपाला रिकामे करण्यास अडचण येऊ शकते.

- ॲड. राहुल तिडके, वकील, नाशिक.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news