बोरगाव मध्ये दुर्मिळ वाघाटी मांजराचे पिल्लांसह दर्शन | पुढारी

बोरगाव मध्ये दुर्मिळ वाघाटी मांजराचे पिल्लांसह दर्शन

निंबळक; पुढारी वृत्तसेवा : तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे उसाच्या फडात वाघाची पिल्ले सापडल्याचा अफवेचे उधाण आले. मात्र ती वाघाची पिल्ले नसून दुर्मिळ व वाघासारख्या दिसणाऱ्या वाघाटी मांजराची पिल्ले असल्याचे सांगली येथील प्राणीमित्र अशोक लकडे यांनी सांगितले.

ऊस शेतकरी सुनील टकले यांनी पिल्लांना आहे त्या जागी ठेवले. यानंतर आईने त्या पिल्लांना घेऊन पोबारा केला.

तालुक्यातील बोरगाव येथील सुनील टकले यांची ऊसशेती आहे. मंगळवारी ऊस तोडणी करत असताना ही पाच पिल्ले ऊस तोडणी कामगारांना दिसून आली.  त्यानंतर स्थानिक नागरिकांना पिल्ले वाघाची किंवा बिबट्याची आहेत असे लक्षात आले. त्यामुळे भितीने त्यांनी काम थांबवले. बोरगावात वाघाची पिल्ल सापडल्याची ही चर्चा सुरू झाली.

तासगाव येथील प्राणीमित्र संकेत पाटील यांनी सांगली येथील पिपल फॉर ॲनिमल च्या अशोक लकडे यांच्या संघटनेशी फोन करून चौकशी केली. त्यांनी ही पिल्ले दुर्मीळ वाघाटी जातीच्या मांजराची आहेत त्यांच्याकडून कोणताही धोका नसल्याचे सांगितले. त्यांना काही करू नका ती स्वतःहून आईसह निघून जातील असे सांगितले.

त्यानंतर संकेत पाटील यांनी शेतकऱ्यांना फोन करून ही वाघाटी जातीचे दुर्मिळ मांजर असून ती सोडून देण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी ती जिथे सापडले तिथे सोडून दिली व त्या पिलाच्या आईने ती पिल्ले तिथून घेऊन निघून गेली.

Back to top button