Sangali: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका मांडण्यासाठी ‘कुटुंब भेट’ कार्यक्रम राबविणार: ॲड.मुळीक

Sangali
Sangali

विटा; पुढारी वृत्तसेवा: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाची भूमिका लोकांपुढे मांडण्यासाठी पक्षाच्यावतीने आम्ही 'कुटुंब भेट' कार्यक्रम सुरू करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी दिली.

खासदार शरद पवार यांच्याशी सांगली जिल्ह्यातील बहुतांश राष्ट्रवादी एकनिष्ठ राहिली आहे. मात्र खानापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे चिरंजीव युवा नेते वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून आल्यानंतर पक्षाची अधिकृत भूमिका मांडली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर, तालुकाध्यक्ष किसन जानकर, ॲड. संदीप मुळीक, तानाजी पाटील, विशाल पाटील, संग्रामसिंह देशमुख प्रमुख उपस्थित होते. ॲड.मुळीक म्हणाले, खानापूर, आटपाडी तालुक्याशी लोकनेते राजारामबापू पाटील आणि खासदार शरद पवार यांचे गेल्या ५० वर्षांपासून घनिष्ट संबंध आहेत. राजकीय संघर्षाच्या काळात जनता पक्ष, समांतर काँग्रेस, समाजवादी काँग्रेस पक्षांना या दोन तालुक्यांनी साथ दिली होती.

१९७९ मध्ये जिल्हा परिषद निवडणूकीत जनता पक्षाचे ५ पंचायत समिती सदस्य तर समांतर काँग्रेसचा १ जिल्हा परिषद सदस्य आणि १ पंचायत समिती सदस्य निवडून आले होते. १९८० साली समाजवादी काँग्रेस कडून हणमंतराव पाटील विधानसभेत निवडून आले होते. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हयात पक्षाने मोठी प्रगती केली. त्यावेळी खानापूर, आटपाडीतून आमदार अनिलराव बाबर विधानसभेवर निवडून आले. या नंतरच्या काळात २००२, २००७ आणि २०१२ साली खानापूर आणि आटपाडी पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे बहुमत होऊन राष्ट्रवादीचे सभापती झाले.

२०१७ साली जिल्हा परिषद निवडणूकीत आटपाडी तालुक्यात १ पंचायत समिती सदस्य आणि खानापूर तालुक्यात १ पंचायत समिती सदस्य हे राष्ट्रवादीचे निवडून आले. विटा पालिकेतही शरद पवार आणि राजाराम बापू पाटील यांच्या विचाराच्या लोकांची बरेच वर्षे सत्ता होती. शहरातील अनेक विकास कामांचा प्रारंभ शरद पवार यांच्या हस्ते झालेले आहे. गेल्या ३० ते ४० वर्षात अनेक कार्यकर्ते शरद पवार व राजारामबापू पाटील यांच्या सोबत होते.

सध्याच्या संघर्षाच्या काळात आम्ही खानापूर व आटपाडी तालुक्यातील राजारामबापू व खासदार शरद पवार साहेबांसोबत काम केलेल्या कार्यकर्त्याच्या कुटूबियांना भेटून त्यांना  शरद पवार आणि जयंत पाटील यांची भूमिका समजावून सांगण्यासाठी हा 'कुटुंब भेट' कार्यक्रम सुरू करणार आहोत, असेही ऍड मुळीक यांनी सांगितले. यावेळी संतोष जाधव, दिशांत धनवडे, सुवर्णा पाटील, सोनाली भगत, नानासाहेब मंडलिक, हरिभाऊ माने, महेश फडतरे, निखिल गायक वाड, सुभाष शिंदे, सुरेश साळुंखे, गणेश कदम, मनोहर चव्हाण, नील प्रभा लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news