ठाण्यात कोरोनाऐवजी दिली रेबीजची लस; डॉक्टर्स, नर्स निलंबित | पुढारी

ठाण्यात कोरोनाऐवजी दिली रेबीजची लस; डॉक्टर्स, नर्स निलंबित

ठाणे , पुढारी वृत्तसेवा : सेलिब्रेटींना बेकायदा लस देण्याचे प्रकरण असो किंवा एकाच महिलेला तीन वेळा लस देण्याचे प्रकरण असे एकामागून एक गंभीर चुका करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने एका रुग्णाला कोरोनाऐवजी रेबीजची लस दिली आहे.

कळवा पूर्व भागात असलेल्या लसीकरण केंद्रावर सोमवारी एका व्यक्तीला कोरोना लस देण्याच्या ऐवजी चक्क रेबीजची लस देण्यात आली आहे.

लस देण्यात आलेल्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल महापौर नरेश म्हस्के यांनी घेतली असून यासंदर्भात मंगळवारी त्वरित बैठक घेतली.

या लसीकरण केंद्रावरील महिला डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेची लसीकरण मोहीम सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली असून आरोग्य विभागाच्या एकामागून एक गंभीर चुकांमुळे या विभागाला अनेकवेळा टीकेचे धनी व्हावे लागले आहे.

पालिकेच्या वतीने सुमारे ५४ लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली असून यामध्ये पालिकेच्या आरोग्य केंद्रांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

कळवा पूर्व भागात अतिकोनेश्वर नगर भागात ठाणे महापालिकेची शाळा असून याच शाळेत खाली आरोग्य केंद्र आहे.

हा परिसर संपूर्ण डोंगरपट्यात असल्याने या परिसरातील नागरिकांसाठी याच ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सोमवारी या ठिकाणी एका व्यक्तीला कोरोनाची लस देण्याच्या ऐवजी रेबीजची लस देण्यात आली असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.

पालिकेचे आरोग्य केंद्र असल्याने या ठिकाणी इतर आजारांवर देखील उपचार केले जातात. त्यामुळे या ठिकाणी कोरोना बरोबर रेबीजची लस देखील उपलब्ध होती.

रेबीजची लस दिल्याची कबुली

सोमवारी कोरोनाची लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लस देण्याच्या ऐवजी रेबीजची लस दिल्याची कबुली दिली आहे.

यापूर्वी सेलिब्रेटींना बेकायदेशीर लस देण्याचे प्रकरण आरोग्य विभागाला चांगलेच भोवले होते.

हे संपूर्ण प्रकरणही विरोधकांनी उचलून धरले होते. त्यानंतर एका महिलेला कोरोना लस देताना तीन वेळा सुई टोचल्याचा प्रकार उघड झाला होता.

त्यावेळी या महिलेला एकाच वेळी तीन डोस दिला असल्याचा आरोप करण्यात आला होता.

तर एक ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर केवळ चौकशीसाठी गेल्यानंतर त्यांना थेट दुसरा डोस घेतला असल्याचा मॅसेज आला होता.

आता कोरोनाच्या ऐवजी थेट रेबीजची लस दिली गेल्याने ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या संदर्भात महापौर नरेश म्हस्के यांना माहिती मिळताच, त्यांनी मंगळवारी या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कोरोनाऐवजी रेबीजची लस दिल्याने संबंधित अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली.

दरम्यान ज्या व्यक्तीला रेबीजची लस देण्यात आली आहे. त्याची प्रकृती व्यवस्थित असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे पालिकेची नाहक बदनामी होत आहे.त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश महापौरांनी दिले. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून येथील डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आहे.

संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, ठा.म.पा

हेही वाचा: 

Back to top button