महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार ४ जूननंतर पडणार: नाना पटोले | पुढारी

महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार ४ जूननंतर पडणार: नाना पटोले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : विधिमंडळ अधिवेशन होऊ घातले होते, ते होणार की नाही होणार? असा प्रश्न आहे. येत्या ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महाराष्ट्रातील राज्य सरकार पडेल, असे भाकित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

भाजप निवडणूक हरत असल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना एनडीएत येण्याची गळ घातली आहे. पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली असली तरी मोदी यांची पराभूत मानसिकता दर्शविणारी विधाने असल्याचे पटोले म्हणाले.

भाजपकडून बूथ कॅपचरचे प्रमाण देशात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. भाजप नेत्यांच्या मुलांनी गुजरातमध्ये सरकार असल्यामुळे बूथ कॅप्चरिंग करून स्वतः इन्स्टाग्रामवर टाकले आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम भाजप करत आहे. निवडणूक आयोगाने तात्काळ याची दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे, असेही पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button