एलआयसीच्या मालकीच्या ८२ उपकरप्राप्त इमारतींचा होणार पुनर्विकास | पुढारी

एलआयसीच्या मालकीच्या ८२ उपकरप्राप्त इमारतींचा होणार पुनर्विकास

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : गिरगाव परिसरातील एलआयसीच्या मालकीच्या ८२ उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी प्रस्ताव द्यावा, अशी भूमिका मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी मांडली. त्यास एलआयसीने सकारात्मक प्रतिसाद दिला.

गिरगाव परिसरातील एलआयसी ऑफ इंडियाची मालकी असलेल्या १२५ वर्ष जुन्या इमारतीचा पुनर्विकास मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या माध्यमातून करण्याची मागणी भाडेकरू व रहिवासी यांनी केली होती. त्यासंदर्भात एलआयसी ऑफ इंडियाचे अधिकारी, खासदार अरविंद सावंत, विनोद घोसाळकर व चाळींतील रहिवाशांची संयुक्त बैठक आज घेण्यात आली.

एलआयसीच्या मालकीच्या दक्षिण मुंबईत अँग्रेवाडी चाळ, नवीन बदामवाडी, देवकरण नाणजी या चाळींमध्ये सुमारे ८२ जुन्या उपकरप्राप्त इमारती असून त्यामध्ये १ हजार ६८ निवासी सदनिका, तर ९८४ अनिवासी सदनिका अशा एकूण २ हजार ५२ सदनिका आहेत. या उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती व देखभाल मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत अनेक वेळा करण्यात आली.

मात्र, या इमारती आता दुरुस्ती करण्यापलीकडे गेल्या आहेत. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास विकास मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत करता येऊ शकतो, अशी भूमिका घोसाळकर व अरविंद सावंत यांनी या बैठकीत मांडली. एलआयसी ऑफ इंडियाने या इमारतींच्या पुनर्विकास संदर्भात तात्काळ म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला प्रस्ताव द्यावा, असे घोसाळकर यांनी सांगितले. त्यास एलआयसी ऑफ इंडियाचे अध्यक्ष कुमार यांनी मान्यता दिली.

 

Back to top button