राजकारण्यांना टार्गेट करण्याचा मोह नडला! वाचा अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या अटकेची रंजक कहाणी | पुढारी

राजकारण्यांना टार्गेट करण्याचा मोह नडला! वाचा अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या अटकेची रंजक कहाणी

भालचंद्र पिंपळवाडकर, मुंबई

दाऊद टोळीपासून स्वतंत्र झाल्यावर भारतातून पलायन, आफ्रिकन देशांमध्ये वास्तव्य, तेथे इतर व्यवसायात बस्तान बसवत प्रतिष्ठित तथा परोपकारी नागरिक अशी प्रतिमा निर्माण करणारा अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला तब्बल 25 वर्षांनी कर्नाटक पोलिसांनी केलेली अटक ही रंजक कहाणी आहे. अर्थात याला तो स्वत:च कारणीभूत ठरला. कर्नाटकातील राजकारण्यांना खंडणीसाठी टार्गेट करण्याचा मोह पुजारीला नडला होता…

पुजारी स्वत:ला ‘देशभक्त डॉन’ म्हणवून घ्यायचा. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटापूर्वी तो दाऊद इब्राहिम टोळीत होता. पुढे या टोळीचे धार्मिक धर्तीवर विभाजन झाल्यावर तो छोटा राजन टोळीत गेला. 1994 मध्ये मुंबईत एका हत्याकांडात जामीन मिळताच तो नेपाळ, बँकॉक, ऑस्ट्रेलिया, युगांडामार्गे पश्चिम आफ्रिकेत गेला. पुढे 2018 पर्यंत कुणालाही त्याचा ठावठिकाणा माहिती नव्हता. हॉटेल व प्लंबिंग व्यावसायिक अँटोनी फर्नांडिस या नावाने तो बुर्किना फासो व सेनेगलमध्ये राहायचा. तेथे वीकेंडच्या क्रिकेट स्पर्धांना निधी देणारा दानशूर उद्योगपती अशी त्याची ओळख होती. 2015 ते 2018 दरम्यान राजकारण्यांना खंडणीसाठी लक्ष्य केल्यावर रवी पुजारी याचे पतन सुरू झाले. आफ्रिकेतील त्याच्या वास्तव्याची माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) व व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (व्हीओआयपी) सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा मागोवा सुरू केला.

पोलिसांसाठी मोठे काम

रवी पुजारी हा भारतातील व्यापारी, अभिनेते व राजकारणी यांना खंडणीसाठी लक्ष्य करीत असला तरी या प्रकरणात त्याच्या थेट सहभागाचे पुरावे मिळत नव्हते. मग पोलिसांनी पश्चिम आफ्रिकेतील त्याच्या नेटवर्कची साथ घेतानाच सेनेगलमधील त्याच्या वास्तव्याबाबत स्थानिक परराष्ट्र अधिकार्‍यांना कळवले. त्यांनी सेनेगलचे मंत्री व राष्ट्राध्यक्ष कार्यालयासह स्थानिक पोलिसांची मदत घेतली. मात्र, खंडणीसाठीचे फोन पॅसिफिक देश, पश्चिम युरोप व आफ्रिकेतून आल्याचे दिसत असल्याने पुजारीचा माग काढणे सोपे होत नव्हते.

अखेर शोध लागला

पुजारी ‘महाराजा’ या रेस्टॉरंट चेनमध्ये गुंतवणूकदार होता. यातच डिसेंबर 2018 च्या प्रारंभी स्थानिक क्रिकेट इव्हेंटमधील त्याच्या उपस्थितीचे छायाचित्र स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित झाले. यानंतर सेनेगलमधील भारतीय अधिकार्‍यांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्याच्या अटकेसह प्रत्यार्पणाची कार्यवाहीही सुरू केली.

अन् जाळ्यात अडकला

19 जानेवारी 2019 रोजी सकाळी डकारमधील एका सलूनमध्ये स्थानिक पोलिसांनी पुजारीच्या मुसक्या आवळल्या. वर्षभरानंतर 22 फेब्रुवारी 2020 रोजी त्याला भारताकडे सोपवण्यात आले. 2018 मध्ये पुजारीला शोधण्याची जबाबदारी सोपवलेले कर्नाटकचे तत्कालीन अतिरिक्त पोलिस महासंचालक (गुप्तचर) अमरकुमार पांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकच पुजारीची ओळख पटवून भारतात आणण्यासाठी तेथे गेले होते.

प्रत्यार्पण प्रक्रिया

ओळख पटविण्यासाठी भारतीय यंत्रणेने पुजारीच्या बोटाचे ठसे सेनेगाली अधिकार्‍यांना पाठवले होते. ही युक्ती कामी आली. मार्च 2019 मध्येच प्रत्यार्पणासाठीची कागदपत्र सेनेगाली यंत्रणेला देण्यात आले होते. मात्र, सेनेगलशी भारताचा द्विपक्षीय प्रत्यार्पण करार नव्हता. त्यामुळे भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी (यूएनसीटीओसी) कलमांतर्गत पुजारीचे प्रत्यार्पण करून घेतले. यासाठी याच कलमांतर्गत इंटरपोलने बजावलेल्या रेडकॉर्नर नोटीसचा फायदा झाला. भारताने इंटरनेटवरील त्याची छायाचित्रे सेनेगाली अधिकार्‍यांना पाठवली होती. पण प्रत्यक्षात पाहिल्यावर त्याच्यातील बदल पाहून आम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला, अशी प्रतिक्रिया पांडे यांनी त्याच्या प्रत्यार्पणानंतर व्यक्त केली होती.

राजकारण्यांना टार्गेट करणे पडले महागात

खंडणीसाठी व्यावसायिकांना लक्ष्य करणे सोडून पुजारीने 2015 ते 2018 दरम्यान कर्नाटकातील 10 राजकारण्यांना टार्गेट केले होते. अखेर कर्नाटकचे तत्कालीन पोलिस प्रमुख नीलमणी राजू यांनी पुजारीला शोधण्याचे काम अमरकुमार पांडे यांच्याकडे सोपवले होते. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

प्रमुख प्रकरणे

2018 पर्यंत पुजारीवर एकट्या कर्नाटकात 96 गुन्हे दाखल आहेत. यात खंडणी, हत्या, धमक्या आदींचा समावेश आहे. महाराष्ट्र, गुजरात, केरळ व इतर राज्यांतही खून, खंडणी व ब्लॅकमेलिंगची प्रकरणे दाखल आहेत. बंगळूरमध्ये 5 जानेवारी 2001 ला बिल्डर सुब्बाराजू यांच्यावर झालेला गोळीबार, 15 फेब्रुवारी 2007 रोजी दोन कामगारांवर गोळीबार, शबनम डेव्हलपर्सच्या मालकाला खंडणीसाठी धमकी आदी प्रकरणांतही पुजारीवर खटले सुरू आहेत.

हेही वाचा : 

Back to top button