नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंजाबमध्ये कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून कॅप्टन अमरिंदर सिंह भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते.
अद्यापही काँग्रेसमध्ये धुसफूसस सुरूच आहे. अशात माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.
अमरिंदर सिंह नवी दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.
असे असले तरी, कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या माध्यम सल्लागार रवीन ठकुराल यांनी या सगळ्या शक्यता नाकारल्या आहेत.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल अनेक बातम्या येत आहे, पंरतु, ते दिल्लीच्या वैयक्तिक दौऱ्यावर आहेत.
तिथे ते त्यांच्या काही मित्रांना भेटणार आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांसाठीचे कपूरथलाचे घरही ते रिकामे करणार आहेत.
त्यामुळे अशा शक्यता वर्तवणे चुकीचे आहे.
दरम्यान, पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाला कंटाळून माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला होता.
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांच्यासोबत त्याचे वाद असल्याचे बोलले जाते.
त्यानंतर काँग्रेसने अमरिंदर सिंह यांच्याजागी चरणजित सिंह चन्नी यांना पंजाबचा नवा मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे.
त्यामुळेच आता शक्यता वर्तवली जात आहे की, काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या वादाला कंटाळून
कॅप्टन अमरिंदर सिंह पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा देऊ शकतात.
आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सोशल मीडियावर आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला.
ते म्हणाले होते की, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा त्यांच्या मुलांप्रमाणे आहेत.
पंरतु, पंजाबसाठी त्यांचे जे धोरण राहिले आहेत, त्यातून त्यांच्यात अनुभवाची कमी साफ दिसते.
हेच नाही तर त्यांनी पक्षात आपल्याला अमानित झाल्यासारखे वाटते असेही ते म्हणाले होते.
त्याच्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. अशात आता कॅप्टन भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपच्या गळाला मोठा मासा लागणार असल्याचे चित्र उभे झाले आहे.
गेल्या आठ महिन्यापासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका पंजाबमध्ये भाजपला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
परंतु, ऐनवेळी कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासारखा मोहरा भाजपच्या हाती लागल्यास सत्तेचा डाव भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :