चित्रनगरीचे शिल्पकार अनंत माने आजही दुर्लक्षित… | पुढारी

चित्रनगरीचे शिल्पकार अनंत माने आजही दुर्लक्षित...

कोल्हापूर : सागर यादव : ‘एक गाव बरा भानगडी’, ‘सवाल माझा ऐका’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘सांगते ऐंका’, ‘मानीनी’, ‘धाकटी जाऊ’, अशा एकापेक्षा एक सरस व चित्रपटप्रेमींच्या मनावर दीर्घकाळ राज्य करणाऱ्या चित्रपटांच्या निर्मितीसह एकाहून एक दिग्गज कलाकार घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य दिग्दर्शक अनंत माने यांनी केले. इतकेच नव्हे तर कोल्हापूर चित्रनगरी उभारणीसाठी पाठपुराव्यासह आंदोलनही केले. असे कोल्हापूर चित्रनगरीचे शिल्पकार आजही दुर्लक्षितच असल्याचे वास्तव आहे.

केवळ सातवी पास असूनही कलाक्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून अनंत माने यांची ओळख आहे. पुण्यातील प्रभात कंपनीत व्ही. शांताराम यांच्याकडे संकलन-निर्मिती- दिग्दर्शन शिकलेल्या माने यांनी प्रभात कंपनी बंद झाल्यानंतर सहकारी मित्रांसोबत स्वतंत्र निर्मिती सुरु केली.

मराठी सिनेमा निर्मितीसाठी त्यांनी कायम समाजात मिसळून कथानकांचा शोध घेतला. त्यामुळे त्यांची प्रत्येक निर्मिती चित्रपटप्रेमींच्या मनाला भिडणारी होती. ग्रामीण भागातील वावरात राबणाऱ्या शेतकऱ्यांना अनंत माने यांच्या सिनेमानी थिएटर मध्ये खेचूण आणणारा वेगळा प्रयोग अनंत माने यांनी यशस्वी केला. किंबहूना महाराष्ट्राचा ग्रामीण इतिहास अभ्यासासाठी माने यांच्याच चित्रपटांचे संदर्भ घ्यावे लागत आहेत.

एवढ्यावर न थांबता अनंत माने यांनी कलाकार तंत्रज्ञ यांना आणखी वाव मिळाला पाहिजे या विचारातून कोल्हापुरात चित्रनगरी व्हावी अशी, चळवळ निर्माण केली. कलाकारांची संघटना तयार करून मागणीचा रेटा वाढविला. यामुळे अखेर मुख्यमंत्र्यानी कोल्हापुरात येऊन चित्रनगरीला मंजुरी दिली. याचे सारे श्रेय थेट अनंत माने यांनाच जाते. कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारकचे ते विश्वस्त होते. ज्या गुरुंकडे संकलन -निर्मिती -दिग्दर्शनाचे धडे गिरवले त्या व्ही. शांताराम यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार मिळावा, अशी अनंत माने यांची इच्छा अखेरपर्यंत अपुरीच राहिली.

अनेक सुपरहिट चित्रपटांबरोबर नामवंत कलाकार घडविण्याची अत्यंत मोलाची कामगिरी दिग्दर्शक अनंत माने यांनी केली. इतकेच नव्हे तर कोल्हापूर चित्रनगरी उभारण्यासाठी पाठपुराव्यापासून आंदोलनापर्यंतची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मात्र चित्रनगरीचे शिल्पकार म्हणून त्यांचा पुतळा राहू द्या, पण साधे तैलचित्र सुद्धा लावले नसल्याची खंत वाटते. दिग्दर्शक अनंत माने यांना त्यांचे गुरु व्ही.शांताराम यांच्या नावे शासनाने मरणोत्तर पुरस्कार देवून गौरवावे.
-वैजयंती माने-भोसले

Back to top button