

इस्लामपूर ; पुढारी वृत्तसेवा :
राज्याच्या सत्तेवर बसलेले लोक हे लुटारु, बदमाश, हत्या करणारे आहेत. त्यांचे एक एक घोटाळे बाहेर निघेल तसे ते फरार होत आहेत. काही दिवसात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निम्मे मंत्री मंडळ हे तुरुंगात तर निम्मे रुग्णालयात असेल असा घणाघात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी येथे बोलताना केला. हिम्मत असेल तर मला कोल्हापुरात जाण्यास रोखून दाखवा असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले. ते आज (मंगळवार) कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत असताना त्यांचे वाळवा तालुका भाजपच्यावतीने वाघवाडी फाटा येथे स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
सोमय्या म्हणाले, या लुटारु टोळीला तुरुंगात घातल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. एका एका मंत्र्याचा घोटाळा बाहेर निघेल तसे ते गायब होत आहेत.
कोणी रुग्णालयात दाखल होतोय तर कोणी बेपत्ताच होतोय. आत्तापर्यंत डझनभर मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले आहेत. लवकरच अन्य काही जणांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.