Pune News : रस्त्यांवरील पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचे संकट | पुढारी

Pune News : रस्त्यांवरील पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचे संकट

बाजीराव गायकवाड

धनकवडी : पुढारी वृत्तसेवा : धनकवडी, बालाजीनगर परिसरातील रस्ते अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात सापडल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धनकवडी, बालाजीनगर व त्रिमूर्ती चौकात वाहतूक कोंडीची समस्या आता नित्याची झाली आहे. परिसरातील बहुतांश मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा ‘नो पार्किंग झोन’मध्ये सर्रास वाहने उभी केली जात आहेत. महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

धनकवडी, बालाजीनगर, धनकवडी पोस्ट ऑफिस ते त्रिमूर्ती चौकातील रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीचे ‘तीन-तेरा’ वाजले आहेत. या भागातील रस्त्यांवर अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जात आहेत. यामुळे नागरिकांना रस्त्याने पायी ये-जा करणेदेखील अवघड होत आहे.

धनकवडी येथील भारती विद्यापीठ परिसर, तसेच त्रिमूर्ती चौकाकडून कै. शिवाजीराव आहेर पाटील चौकादरम्यान, (धनकवडी पोस्ट ऑफिस चौक) महाराष्ट्र भूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी रस्त्यावर दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहनांचे पार्किंग केले जात आहे. तसेच, बहुतांश रस्त्यांवर गेल्या कित्येक वर्षांपासून बेवारस वाहणे उभी करण्यात आली असून, त्यामुळेदेखील वाहतुकीस अडथळा होत आहे. मुख्य रस्त्यावर नेहमी वर्दळ असल्याने अनेक वेळा छोटे, मोठे अपघात होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई करून ही वाहने हटवण्यात यावीत, दररोज या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करण्यात यावेत, तसेच रस्त्यांवर ’पी वन’, ’पी टू’ पार्किंगचे फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्ता खोदाईमुळे वाहतुकीस अडथळा

भारती विद्यापीठ परिसरातील चौकांमध्ये, तसेच धनकवडी पोस्ट ऑफिस ते त्रिमूर्ती चौक आणि त्रिमूर्ती चौक ते राजमाता भुयारी मार्गापर्यंत ठिकठिकाणी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

धनकवडी परिसरामध्ये ‘नो पार्किंग झोन’, तसेच रस्त्यांवर दुतर्फा लावण्यात येणार्‍या वाहनांवर नियमित दंडात्मक कारवाई केली जात आहे. वाहनचालकांनी ‘नो पार्किंग’ असलेल्या रस्त्यांवर वाहने उभी करू नयेत; अन्यथा कारवाई करण्यात येईल

-यश बोराटे, पोलिस उपनिरीक्षक, सहकारनगर वाहतूक विभाग

धनकवडी परिसरातील रस्त्यांवर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर गेल्या दीड महिन्यापूर्वी नोटीस चिकटवून कारवाई केली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.

-राकेश गुर्रम, सहायक आयुक्त, धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा

Back to top button