

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील चार जागांसाठी आज (२६ जून) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक, तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ या ४ जागांकरिता आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे.
यंदा मुंबईत पदवीधर मतदारांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदविण्यात आली. राज्य निवडणूक कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत यंदा १लाख १६ हजार ९२३ पदवीधर मतदारांनी नोंदणी केली. २०१८ च्या तुलनेत त्यात ४६ हजारांची वाढ झाली आहे. ज्या पक्षाची मतदार नोंदणी अधिक, त्यांचा विजय निश्चित, हे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे समीकरण आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपचे शिवनाथ दराडे, शिवसेनेचे शिवाजी शेंडगे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजी नलावडे, शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर आणि शिक्षक भारती सुभाष मोरे अशी पंचरंगी लढत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप महायुतीचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसच्या रमेश कीर यांच्यात लढत होत आहे.
मुंबई पदवीधर : किरण शेलार (भाजप महायुती) विरुद्ध अनिल परब (महाविकास आघाडी).
कोकण पदवीधर : निरंजन डावखरे (भाजप महायुती) विरुद्ध रमेश कीर (महाविकास आघाडी).
मुंबई शिक्षक : शिवनाथ दराडे (भाजप), शिवाजी शेंडगे (शिवसेना), शिवाजी नलावडे (राष्ट्रवादी), ज. मो. अभ्यंकर (उबाठा), सुभाष मोरे (शिक्षक भारती).
नाशिक शिक्षक : किशोर दराडे (शिवसेना महायुती), संदीप गुळवे (महाविकास आघाडी), विवेक कोल्हे (अपक्ष).