

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्विड लिंजर लाऊंज या रेस्टॉरंट बारमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने मंगळवारी कारवाई करत बारमध्ये अनधिकृतपणे करण्यात आलेल्या बदलांवर कारवाई केली.
कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातानंतर पुण्यातील पब्सचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले
व्हायरल झालेल्या व्हिडीओत तरूणांकडून ड्रग्सचे सेवन होत आहे, असे दिसून आले
L3 पब मध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्टीत ड्रग्सचे सेवन करण्यात आले
महिन्याभरापूर्वी कल्याणीनगर येथील पबमधून निघालेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दोघांचा बळी घेतल्यानंतर शहरातील पब संस्कृतीच्या आड सुरू असलेला गोरखधंदा चव्हाट्यावर आला. यामुळे शासनाची नाचक्की झालीच. यातून मोठ्याप्रमाणावर कारवाई सुरू झाली. यानंतरही रविवारी फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्विड लिंजर लाऊंज या रेस्टॉरंट बारमध्ये रात्री उशिरापर्यंत दारू विक्री आणि पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये अमली पदार्थांचेही सेवन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामुळे पुन्हा एकदा प्रशासकीय यंत्रणा आणि पब चालकांचे साटेलोटे असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेवरून पुन्हा सत्ताधारी विरोधकांच्या रडारवर आले आहेत.
पोलिस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत एका पोलिस निरीक्षकासह तीन कर्मचारी निलंबीत केले. तसेच बार चालकासह मालकासही अटक केली आहे. शिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा बार सिल केला.
यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने मंगळवारी बारमध्ये अनधिकृतपणे केलेल्या बदलावर व बांधकामांवर हातोडा चालवला. यावेळी महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, बांधकामातील बदलाचा प्रस्ताव आम्ही महापालिकेकडे दाखल केला आहे. त्यामुळे कारवाई करता येणार नाही, याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू, असे मत बार मालकाने नोंदवले आहे.
महानगरपालिकेची बांधकाम बदलासंदर्भातील कोणतीही परवानगी न घेता इमारतीच्या बांधकामात बदल करून बार सुरू केल्याप्रकरणी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातील इमारत निरीक्षक राहुल रसाळे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हॉटेलचे मालक संतोष कामठे व चालक (वापरकर्ते) रवी माहेश्वरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रेस्टॉरंट आणि बार असलेल्या हॉटेलचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने पब असा करण्यात येत आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम केलेले नाही. बारमध्ये जो अंतर्गत बदल केला आहे, त्याच्या परवानगीचा प्रस्ताव महापालिकेला व राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिला आहे. बारवर करण्यात आलेली कारवाई केवळ राजकीय दबावापोटी आहे, असा आरोप हॉटेलचे मालक प्रतिक कामठे यांनी केला आहे. महापालिकेच्या या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचेही कामठे यांनी सांगितले आहे.
फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड, लीजर, लाउंज (एल थ्री) बारमधील झालेली बेकायदा पार्टी, तसेच अमली पदार्थ सेवन करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला. एल थ्री बारचा परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले.
‘एल थ्री ’ बारमध्ये रविवारी मध्यरात्री बेकायदा पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीसाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच, पार्टीत अल्पवयीन मुले सामील झाली होती. समाजमाध्यमात एल-थ्री मधील पार्टी आणि प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत प्रसारित झाली. त्यानंतर पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली.
पोलिसांनी लिक्विड लीजर लाउंज (एल थ्री) बारचे जागामालक संतोष विठ्ठल कामठे (रा. 447/4, रजनीगंधा अपार्टमेंट, शिवाजीनगर), बारचालक उत्कर्ष कालिदास देशमाने (रा. फ्लॅट नं. 302, साईप्रसाद अपार्टमेंट लेन नं. 10 मुंजाबा वस्ती, धानोरी), योगेंद्र गिरासे (रा. भूगाव), रवी माहेश्वरी (रा. एच 1006, 382 पार्क, मॅजेस्टिक, उंड्री), पार्टीचे आयोजक अक्षय दत्तात्रेय कामठे (रा. हडपसर), ध्वनिक्षेपक यंत्रणा सांभाळणारा (डीजे) दिनेश मानकर (रा. नाना पेठ), तसेच पार्टीचे आयोजन करणारे रोहन राजू गायकवाड (रा. भोसले पार्क, हडपसर) आणि मानस मलिक (वय 33, रा. फ्लॅट नं. 42, जय जवाननगर, राम मंदिराजवळ, येरवडा) यांना अटक केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानेही रविवारी सायंकाळी एल थ्री बारमध्ये छापा टाकून सव्वातीन लाख रुपयांचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी सहा कर्मचार्यांना (वेटर) अटक केली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक अनंत पाटील आणि विठ्ठल बोबडे यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे कार्यालयाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी दिली.
इमारतीतील तळमजला आणि पहिल्या मजल्यावर संतोष कामठे यांच्या नावाने हॉटेल रेनबोला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. सध्या रेनबो हॉटेलचे नाव बदलण्यात आले असून, एल थ्री बार नावाने तेथे व्यवसाय करणात येत आहे. पहिल्या आणि दुसर्या मजल्यावर जाण्यासाठी छुपा मार्ग काढून मंजूर नकाशात बदल करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.