पुणे: बलात्काराच्या केसची धमकी; व्यावसायिकाला लुबाडणार्‍या वकीलाला अटक | पुढारी

पुणे: बलात्काराच्या केसची धमकी; व्यावसायिकाला लुबाडणार्‍या वकीलाला अटक

पुणे, पुढारी वृत्तसेवा: हनी ट्रॅपमध्ये अडकविल्यानंतर बलात्काराची केस करण्याची धमकी देऊन व्यवसायिकाला साडे सतरा लाखाला लुबाडणार्‍या वकिलाला हडपसर पोलिसांनी अटक केली. व्यवसायाबाबत बोलायचे आहे, असे सांगून फ्लॅटवर नेऊन एका तरुणीने त्यांच्या सोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांना बलात्काराची केस करण्याची धमकी देण्यात आली. विक्रम भाटे (वय 35, रा. हडपसर) अशी अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. तर वाघोली येथील 25 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मगरपट्टा सिटी येथील एका 42 वर्षाच्या व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. हा प्रकार सिजन मॉल, आरोपी तरुणी हिच्या घरी आणि भाटे याच्या कार्यालयात 3 ऑगस्ट 2022 पासून आतापर्यंत सुरु होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. त्यांचा फुड प्रोसेसिंगचा व्यवसाय आहे. ते 3 ऑगस्ट 2022 रोजी त्यांचा मित्र व त्याची मैत्रिण यांच्याबरोबर सिजन मॉल येथील रेस्टारंटमध्ये गेले होते. त्यावेळी आरोपी तरुणीने ओळख करुन घेऊन त्यांचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर तिने व्हॉटसअ‍ॅप कॉलवर फिर्यादी यांच्याशी बोलणे सुरु केले. 7 नोव्हेंबर रोजी तिने व्यवसायाबाबत बोलायचे आहे, असे म्हणून तिच्या वाघोलीतील फ्लॅटवर नेले. तेथे ती बेडरुममध्ये गेली व पारदर्शक नाईट ड्रेस घालून बाहेर आली. फिर्यादी यांच्या शेजारी बसून तिने 4-5 क्लोज सेल्फी काढले.

15 नोव्हेंबर रोजी तरुणीच्या फोनवरुन तिचा वकील भाटे याने फोन केला. तिने तुमच्यावर अशी तक्रार केली आहे की, त्यामध्ये तुम्हाला बेल मिळणार नाही. हे प्रकरण मिटवायचे असेल तर मला सांगा. मी तुम्हाला मदत करतो. तुमची केस मिटून टाकतो, असे सांगून त्यांच्याकडे 8 लाखांची मागणी केली. त्यांनी दागिने गहाण ठेवून पैसे दिले. त्यानंतर विक्रम भाटे याने वेळोवेळी त्यांना धमकावून अगदी सर्वोच्च न्यायालयातही जामीन मिळणार नाही, असे सांगून त्यांना लुबाडत राहिला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी विक्रम भाटे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करीत आहेत.

Back to top button