

निमोणे: महामार्गावरील अपघात, पूर व गुन्हेगारी घटनांमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी धावून जाणाऱ्या शिंदोडीच्या आपत्ती व्यवस्थापन संघाने मावळत्या वर्षात 84 जणांचे प्राण वाचवून मानवतेचा जिवंत वस्तुपाठ समाजासमोर ठेवला आहे.
महामार्गावरील भीषण अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा गुन्हेगारी कृत्यांमधून निर्माण झालेल्या संकट प्रसंगी शिंदोडी येथील आपत्ती व्यवस्थापन संघ समाजासाठी आधारवड ठरत आहे. अपघातात जखमी झालेले प्रवासी तसेच पुरात अडकलेले जीव वाचविण्याचे कठीण काम या संघाने सातत्याने पार पाडले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन दौलतनाना शितोळे यांनी आपत्ती व्यवस्थापन संघाची स्थापना केली. उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी स्थापनेपासूनच या संघाच्या मानवतावादी कार्याला पाठबळ दिले. या बळावरच पुणे-अहिल्यानगर, पुणे-मुंबई, पुणे-नाशिक तसेच समृद्धी महामार्गावर संघाचे जवान अपघातग््रास्तांच्या मदतीसाठी तत्पर असतात. सामाजिक बांधिलकीतून एकत्र आलेले संघाचे सदस्य अपघातग््रास्तांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी धडपडत असतात. याशिवाय पूरस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून शेकडो नागरिकांचे प्राण वाचविण्याचे कार्यही या संघाने केले आहे.
वर्षाच्या सुरुवातीला श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे गाजलेल्या माऊली गव्हाणे हत्याकांडात विहिरीत टाकलेला मृतदेह शोधण्यासाठी संघाच्या जवानांनी अथक प्रयत्न करीत पोलिस दलाला मोलाची मदत केली. तसेच, निमगाव महाळुंगी येथील पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह शोधण्याचे अवघड कार्यही त्यांनी पार पाडले.
महामार्गांवरील अपघातांमध्ये चालू वर्षात 84 जणांना तातडीची मदत करून जीवदान देण्यात संघ यशस्वी ठरला आहे. रस्ते अपघातात जायबंदी झालेल्या जिवांसाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करतो. उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल यांच्या सहकार्यामुळे हे कार्य अधिक प्रभावीपणे करता येत असल्याचे संघाचे संस्थापक दौलतनाना शितोळे यांनी सांगितले.