

निफाड (नाशिक) : उत्तर भारताकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे निफाड तालुक्यात थंडीचा तीव्र कडाका जाणवत असून, शनिवारी (दि.20) रोजी हंगामातील नीचांकी ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर नाशिकला 6.3 इतके तापमान नोंदविले. या कडाक्याच्या थंडीमुळे निफाड, नाशिकसह जिल्हावाशियांना अक्षरशः गारठून गेला आहे.
पहाटेच्या सुमारास पसरलेले दाट धुके आणि बोचऱ्या वाऱ्यांमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. सकाळच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला, तर बाजारपेठाही उशिरा सुरू झाल्या. कामावर जाणारे मजूर आणि दुचाकीस्वारांना या थंडीचा मोठा फटका बसला. थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या असून, उबदार कपड्यांचा आधार घेतला आहे.
शेतीवर सावट: वाढत्या गारठ्याचा परिणाम आता शेतीवरही दिसू लागला आहे. द्राक्ष बागा, कांदा आणि भाजीपाला पिकांवर दवबिंदू साचल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे बळीराजा चिंतेत असून पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी धडपडत आहेत.
आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
थंडीचा जोर वाढल्याने सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य विभागाने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींनी पहाटे आणि रात्री घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे