

Epstein files:
वॉशिंग्टन डी सी : सर्व जगाचे लक्ष लागून राहिलेल्या बाल लैंगिक शोषणातील गुन्हेगार जेफ्री एप्स्टिन याच्याविषयीच्या फाइल्स अमेरिकेच्या न्याय विभागाने जाहीर केल्यानंतर काही तासांतच वेबसाइटवरून महत्त्वाची माहिती गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या वेबसाइटवरून किमान १६ फाइल्स गायब झाल्या आहेत. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश असलेला एक फोटोदेखील होता.
शुक्रवारी न्याय विभागाने इप्स्टीन प्रकरणाशी संबंधित हजारो कागदपत्रे आणि छायाचित्रे सार्वजनिक केली होती. मात्र, शनिवारी सकाळी यातील १६ फाईल्स वेबसाइटवरून हटवण्यात आल्याचे समोर आले. गायब झालेल्या साहित्यामध्ये नग्न महिलांची काही चित्रे आणि एका विशेष छायाचित्राचा समावेश होता. या फोटोमध्ये डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प, जेफ्री इप्स्टीन आणि त्याची सहकारी घिसलेन मॅक्सवेल एकत्र दिसत होते. एका खोलीतील फर्निचरवर ठेवलेल्या फोटोंच्या संग्रहात हे छायाचित्र दिसून आले होते. या चित्राला फाइल ४६८ असे लेबल लावण्यात आले आहे.
माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेटस्, नामवंत तत्त्वज्ञ आणि पॉलिटिकल अॅक्टिव्हिस्ट नोआम चॉम्स्की, चित्रपट निर्माते वूडी अँलन, गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन, सुपरस्टार मायकेल जॅक्सन, इंग्लंडचे प्रिन्स अॅन्ड्रयू इत्यादींची छायाचित्रे त्यात आढळून आली आहेत. या छायाचित्रांना कोणताही संदर्भ नसल्याने या व्यक्ती एप्सटिनच्या गैरकृत्यात दोषी असल्याचे ठामपणे म्हणता येणार नसले तरी हे सर्व वादग्रस्त ठरू शकतात.
जेफरी एप्सटिन हे एक अमेरिकन धनाढ्य प्रस्थ होते. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि लैंगिक तस्करीचे आरोप त्याच्यावर आहेत. विविध क्षेत्रातील बड्या व्यक्तीना मुली पुरवण्याचे त्याचे जाळे होते. २०१९ मध्ये त्याला न्यूयॉर्क मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्या काळात तुरुंगात त्यांच्या मृत्यूची अधिकृत नोंद आत्महत्येच्या रूपात झाली, परंतु त्यांच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाविषयी अनेक उलटसुलट तर्क केले जात आहेत. एप्सटिन फाईल्स खुल्या करण्याबाबत ट्रम्प सुरुवातीपासून फारसे तयार नव्हते डेमोक्रॅटिक पक्षाचा मला बदनाम करण्यासंबंधीचा हा कुटील डाव आहे, असे ते सांगत होते. पण त्यांच्या मागा (मेक अमेरिका ग्रेट अगेन) समर्थकांनी त्या खुल्या करण्याचा आग्रह धरल्याने त्यांचा नाईलाज झाला. ट्रम्प आणि एप्सटिन यांच्या संबंधाबाबतही अनेक उलट सुलट चर्चा आहेत. त्यामुळे अमेरिकेत त्याकडे अधिक लक्ष आहे.