

नाशिक : शहरात डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांत मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात. पतंग उडविण्यासाठी वापरात येणारा नायलॉन मांजा वापरला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वन्य प्राणी, पक्षी व मानवी जीवितास धोका निर्माण होत त्यांचे जखमी होण्याचे व प्राण गमावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
नायलॉन मांजामुळे विजेच्या तारांचे परस्पर घर्षण होऊन वीज प्रवाह खंडित होणे, आग लागणे अशा घटनाही घडतात. यास प्रतिबंध म्हणून महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ज्या मांजांना काचेचे कोटिंग आहे, अशा टोकदार व धारदार चायनीज मांजाची निर्मिती, विक्री, साठा व वापरावर प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे. कोणी व्यक्ती शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दांडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा पद्धतीचा नायलॉन मांजा बाळगेल, वापर करेल अशा व्यक्तीवरही हा आदेश लागू राहील. हा आदेश २० डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ३ जानेवारीपर्यंत अंमलात असेल. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहितेनुसार शिक्षेस पात्र असेल, असेही आदेशात नमूद केले आहे.