

Railway Ticket Price Hike
नवी दिल्ली: एसी डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या आणि मेल व एक्सप्रेस गाड्यांमधील नॉन-एसी प्रवाशांना २६ डिसेंबरपासून थोडे अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने या श्रेणींसाठी प्रति किलोमीटर २ पैशांनी भाडे वाढवले आहे. मात्र नॉन-एसी डब्यात ५०० किलोमीटर प्रवास करणाऱ्या प्रवाशाला १० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, सामान्य श्रेणीत २१५ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी भाडे प्रति किलोमीटर १ पैशाने वाढेल आहे. मेल आणि एक्सप्रेस नॉन-एसी श्रेणींमध्ये भाडेवाढ प्रति किलोमीटर २ पैसे आहे, तर एसी श्रेणींमध्ये देखील प्रति किलोमीटर २ पैशांची माफक वाढ होणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील रेल्वेने केलेली दुसरी भाडेवाढ आहे. यापूर्वीची जुलै महिन्यात भाडेवाढ लागू करण्यात आली होती. आता झालेली प्रवास भाडेवाढीत साधारण वर्गातून (Ordinary Class) २१५ किमी पर्यंत प्रवास करणाऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. अल्प अंतराचा प्रवास करणारे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याची झळ बसणार नाही, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
रेल्वे प्रवाशांमध्ये सर्वात मोठा वाटा असणार्या उपनगरीय सेवा आणि मासिक पाससाठी कोणतीही दरवाढ झालेली नाही. तसेच २१५ किलोमीटरपर्यंत प्रवास करणाऱ्या सामान्य श्रेणीतील प्रवाशांना कोणतीही भाडेवाढ लागू होणार नाही, असे रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या दशकात भारतीय रेल्वेने आपले जाळे आणि कामकाज लक्षणीयरीत्या विस्तारले आहे. अधिक रेल्वे सेवा, जास्त वेग आणि सुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे, मनुष्यबळाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, मनुष्यबळाचा खर्च १.१५ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. निवृत्तीवेतनाची देयता ६०,००० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी, कामकाजाचा एकूण खर्च २.६३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या वाढत्या खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी, रेल्वे मर्यादित प्रवासी भाडे तर्कसंगतीकरणासोबतच मालवाहतूक वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, असे रेल्वे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.