

सिन्नर (नाशिक) : तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याच्या दोन दुर्दैवी घटना घडल्या. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सिन्नर व एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील दोन्ही घटनांची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
पहिली घटना माळेगाव एमआयडीसी परिसरातील आहे. भीमा निवृत्ती सांगळे यांच्या खोलीत भाड्याने राहात असलेला अंकित बच्चाकुमार (२०, रा. चित्रकूट, उत्तर प्रदेश) याने लोखंडी अँगलला टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. याबाबत सुधीर विश्वकर्मा यांनी पोलिसांना माहिती दिली. अंकितकुमारला तातडीने रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. सहायक उपनिरीक्षक टेमगर अधिक तपास करीत आहेत. दुसरी घटना धोंडबार शिवारातील कवटे मळा येथे घडली. रानू मनाजी कवटे (४५) हे आजारी असल्यामुळे महिनाभरापासून घरीच होते. मानसिक तणावातून त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. याबाबत त्यांचे मामेभाऊ शिवाजी खेताडे यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात माहिती दिली. रानू कवटे यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ही घटना शुक्रवारी (दि. १९) सकाळी 10.30 च्या सुमारास घडली. या प्रकरणी पारधी अधिक तपास करीत आहेत.
सिन्नर : शहरातील विजयनगर परिसरात भरदिवसा चेन स्नॅचिंगची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी (दि. १८) दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली.
स्टाइसच्या संचालिका सिंधू नामकर्ण आवारे (६१) या घरासमोर साफसफाईचे काम करणाऱ्या मजुरांना सूचना देत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी आवारे यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून पळ काढला. यात ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहे. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात चोरी व चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रूपाली चव्हाण अधिक तपास करत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.