

दिवे: तरकारी-भाजीपाला पिकांचे बाजारभाव कधी गडगडतील याचा भरवसा नसतो. अशा परिस्थितीत पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना याच पिकांवर आपले आर्थिक गणित जुळवावे लागते. मात्र, या उत्पन्नातील अनिश्चिततेवर मात करण्यासाठी दिवे गावचे प्रगतशील शेतकरी भरत झेंडे व पूनम झेंडे या दाम्पत्याने शेतीला जोडधंदा करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि तो यशस्वी करून दाखवला.
सखोल माहिती घेतल्यानंतर झेंडे दाम्पत्याने राजस्थान व मध्य प्रदेश येथून सोजत व कोठा या जातीच्या शेळ्या व बोकडांची खरेदी केली. त्याचबरोबर स्थानिक गावरान शेळ्यांचाही समावेश केला. खंबाई माता मंदिर परिसरात त्यांनी शास्त्रशुद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने शेळीपालनासाठी विशेष शेड उभारले आहे. या शेडमध्ये वेगवेगळ्या जातींसाठी स्वतंत्र व्यवस्था असून, शेळ्यांची विष्ठा थेट खालच्या भागात पडेल अशी रचना करण्यात आली आहे. या ठिकाणी गावरान कोंबड्यांचेही पालन करण्यात येत असल्याने दुहेरी उत्पन्नाचा स्रोत तयार झाला आहे.
व्यवसायातील सातत्य, कठोर मेहनत व चिकाटीच्या जोरावर झेंडे दाम्पत्याने आज शेळीपालनात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. शेळ्यांना दर्जेदार खाद्य देण्यावर विशेष भर दिला जातो. यामध्ये मेथीचा घास, तुरीचा भुसा व गव्हाचा भुसा यांचा समावेश असतो. तसेच, शेळ्यांचे नियमित लसीकरण करण्यात येते व आजाराची लक्षणे दिसताच तत्काळ उपचार केले जातात. या काटेकोर व्यवस्थापनामुळे आजपर्यंत त्यांना कोणताही आर्थिक तोटा सहन करावा लागलेला नाही.
कोठा जातीच्या बोकडाचे वजन साधारणतः 50 ते 55 किलोपर्यंत जाते. अशा बोकडाची विक्री 35 ते 40 हजार रुपये दरम्यान होत असल्याचे भरत झेंडे यांनी सांगितले. इतर बोकडांनाही चांगली मागणी असून, त्यातूनही समाधानकारक उत्पन्न मिळत आहे.
याशिवाय गावरान अंड्यांची विक्री करून अतिरिक्त आर्थिक फायदा होत असल्याचे झेंडे दाम्पत्याने सांगितले. शेतीतील जोखीम ओळखून जोडधंद्याची योग्य निवड केल्यास आर्थिक स्थैर्य साधता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण झेंडे दाम्पत्याने पुरंदर तालुक्यात उभे केले आहे.