पुणे : एन्फ्ल्युएन्झाची लक्षणे दिसल्यास उपचार घ्या ; आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन | पुढारी

पुणे : एन्फ्ल्युएन्झाची लक्षणे दिसल्यास उपचार घ्या ; आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात एन्फ्ल्युएन्झा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना दिल्या आहेत. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत, अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले. एच3एन2 फ्लूसदृश आजारचे रुग्ण रोज वाढत आहेत. एन्फ्ल्युएन्झा ए विषाणूमुळे होणारा हा आजार आहे. ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे आढळून येत आहेत. याबाबत सर्व आरोग्य केंद्रांत रुग्णाची तपासणी करून मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार देण्यात येत आहेत.

राज्यात एन्फ्ल्युएन्झा आजार मुख्यत्वे पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शहरी भागात दिसून येत आहेत. सर्व रुग्णालयांमध्ये संशयित रुग्णांना आवश्यकतेनुसार विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येतात. तसेच आरोग्य संस्थेत आजारावरील उपचारासाठी लागणारी औषधे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

या उपाययोजना करा…
विभागीय आयुक्त स्तरावर सर्व संबंधित यंत्रणांची बैठक व आढावा आणि उपाययोजना करावी.

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका आयुक्त यांनी संबंधित लक्षण असलेल्या रुग्णांबाबत घरभेटीसह सर्वेक्षण करण्याबाबत कार्यवाही करावी.

औषधांचे साठे, ऑक्सिजन साठे व उपकरणे यांची उपलब्धता तपासावी.

आवश्यकतेप्रमाणे लसीकरणाचा वेग वाढवावा.

गरोदर माता, वयोवृद्ध व दुर्धर आजारांनी ग्रस्त यांची विशेष काळजी घ्यावी.

विषाणूची लक्षणे दिसताच 72 तासांच्या आत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास तो नियंत्रणात येऊ शकतो,
याची माहिती जनमानसापर्यंत पोहचवावी.

Back to top button