

House Burglary Bhoom
भूम : भूम शहरातील परंडा रोडवरील शिवाजीनगर परिसरात भर दिवसा घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १९ डिसेंबर) दुपारी सुमारे एकच्या सुमारास घडल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिवाजीनगर येथील दिनेश सोमनाथ डोके यांच्या घरात ही चोरी झाली. डोके हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते, तर त्यांची आई शेजारी पाहुण्यांकडे जाण्यासाठी घराला कुलूप लावून गेली होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा घराचे कुलूप तोडले व कपाटातील सोन्याचे दागिने पळवले. सुमारे पंधरा ते वीस मिनिटांनंतर डोके यांच्या आई घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. रहदारीच्या ठिकाणी व भर दिवसा चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, पोलिस निरीक्षक गणेश कानघुडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असून काही धागेदोरे मिळतात का, यासाठी तपास मोहीम हाती घेतली आहे. डोके हे बाहेरगावी असल्याने नेमके किती सोन्याचे दागिने चोरीला गेले, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नसल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू असल्याचेही सांगितले आहे.