

Chandrapur illegal moneylenders
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध सावकारीतून घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शुक्रवारी (दि.१९) जिल्ह्यातील सर्व सावकारांची आढावा बैठक घेतली. सावकारी कायदा व अधिनियम 2014 मध्ये दिलेल्या नियमांचे पालन करूनच सावकारी करणे बंधनकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नियोजन सभागृह येथे पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त् पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जयसिंह ठाकूर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, महाराष्ट्रात सावकारी कायदा अधिनियम -2014 लागू आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून सावकारांनी नियमांचे पालन करावे. सर्व परवानाधारक सावकारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. शासनाने व्याजाचा दर निश्चित केला आहे. या दरापेक्षा जास्त दर आकारू नये. जास्त दर लावणे हा गुन्हा असून कायदेशीर कारवाईची तरतुद नियमात आहे. तसेच कर्ज दिल्यानंतर वसुलीकरीता मारहाण, अवैध मार्गाने दमदाटी व बळजबरी करता येणार नाही. व्यवसाय करतांना नियम आणि कायदे पाळणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी स्पष्ट केले.
पोलिस अधीक्षक सुदर्शन म्हणाले, परवानाधारक सावकारांनी नियमातच आपला व्यवसाय करावा. अैवधरित्या सुरू असलेल्या सावकारीची माहिती असल्यास पोलिस प्रशासनाला कळवावी. माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
सादरीकरणात जिल्हा उपनिबंधक ठाकूर यांनी उपस्थित सावकारांना कायद्याबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, सावकारी कायदा व अधिनियम 2014 च्या कलम 5 नुसार व्यवसायासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. सावकारी रेकॉडची तपासणी करण्याकरीता निबंधकाने मागणी केल्यास कलम 16 नुसार ती उपलब्ध करून देणे प्रत्येकाला बंधनकारक आहे. तसेच अवैध सावकारीतून मालमत्ता खरेदी केली असल्यास कलम 18 नुसार ती रद्द करण्याचे अधिकार निबंधकांना आहे. राज्य शासनाच्य 16 सप्टेंबर 2014 च्या कायद्यामध्ये व्याजाचे दर निश्चित करण्यात आले आहे. यापेक्षा जास्त दर लावले तर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा हेल्पलाईन क्र. 18002338691 वर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, सहाय्यक निबंधक, सहकार विभाग, उप निबंधक, सहकार विभाग, जवळचे पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल करू शकतो. आपली तक्रार गोपनीय ठेवण्यात येईल.