

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट क्षेत्रातील दोन दिग्गज नावे आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध चेहरे सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) रडारवर आले आहेत. ऑनलाइन सट्टेबाजी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी 'ईडी'ने १९ डिसेंबर रोजी मोठी कारवाई करत माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
हे संपूर्ण प्रकरण '1xBet' नावाच्या ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित आहे. ईडीच्या तपासानुसार, हे अॅप भारतात कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे सट्टेबाजीचा व्यवसाय चालवत होते. या माध्यमातून सुमारे १००० कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी याच प्रकरणात शिखर धवन आणि सुरेश रैना यांचीही मालमत्ता जप्त करण्यात आली होती.
ईडीने शुक्रवारी केलेल्या कारवाईत एकूण ७.९३ कोटींची मालमत्ता जप्त केली. यामध्ये क्रिकेटपटूंसोबतच चित्रपट सृष्टीतील नामांकित व्यक्तींचाही समावेश आहे.
युवराज सिंग : २.५ कोटी
रॉबिन उथप्पा : ८.२६ लाख
सोनू सूद : १ कोटी
नेहा शर्मा : १.२६ कोटी
उर्वशी रौतेला : २.०२ कोटी (मालमत्ता आईच्या नावावर नोंदणीकृत)
मिमी चक्रवर्ती : ५९ लाख
अंकुश हाजरा : ४७.२० लाख
यापूर्वी शिखर धवन (४.५५ कोटी) आणि सुरेश रैना (६.६४ कोटी) यांच्यावर कारवाई झाली असून, आतापर्यंत या प्रकरणात एकूण १९.०७ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
'1xBet' हे स्वतःला जागतिक स्तरावरील बुकी मानत असून ७० भाषांमध्ये आपली सेवा पुरवत असल्याचा दावा करते. मात्र, ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की, या अॅपने गुंतवणूकदारांची फसवणूक केली असून मोठ्या प्रमाणावर कर चोरी केली आहे. या अॅपच्या प्रमोशनमध्ये आणि आर्थिक व्यवहारात गुंतल्याच्या संशयावरून या सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली होती आणि आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
समाजसेवेसाठी ओळखला जाणारा सोनू सूद आणि भारताचा वर्ल्ड कप विजेता क्रिकेटर युवराज सिंग यांची नावे या घोटाळ्यात आल्याने चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. या सेलिब्रिटींनी बेकायदेशीर बेटिंग अॅप्सचा प्रचार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.