

विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील केंबूर्णेवाडी गावाजवळ बिबट्याचा वावर प्रचंड वाढला असून, विशाळगड-आंबा घाट हा चढ उतारांचा मुख्य मार्ग आता दिवसा आणि रात्रीच्या प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. गावापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर बिबट्याचे हमखास दर्शन होत असून, बिबट्या चक्क रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून बसत असल्याने वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गाडी जवळ आली तरी जागचा हलेना!
गजापूर येथील युवा सेना तालुका अध्यक्ष निखिल नारकर यांना या मार्गावरून प्रवास करताना या थरारक अनुभवाचा सामना करावा लागला. नारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्या रस्त्याच्या मधोमध बसलेला होता. विशेष म्हणजे, चारचाकी वाहन अगदी जवळून गेले तरी बिबट्या तिथून हलण्यास तयार नव्हता. बिबट्याला मानवी वर्दळीचा किंवा वाहनांचा आता कोणताही धाक उरलेला नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढले
हा मार्ग घनदाट जंगलातून जातो. गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याने आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. परिसरातील शेळ्या-मेंढ्या आणि पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ले चढवले असून, अनेक जनावरे फस्त केली आहेत. केंबूर्णेवाडी गावाच्या अगदी हाकेच्या अंतरावर बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ सायंकाळच्या वेळी घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.
प्रवासी आणि स्थानिक धास्तावले
विशाळगड दर्शनासाठी येणारे पर्यटक आणि स्थानिक प्रवाशांची या मार्गावर सतत वर्दळ असते. मात्र, बिबट्या भररस्त्यातच बसत असल्याने दुचाकीस्वारांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने या प्रकरणी तातडीने लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
मी स्वतः चार चाकी गाडीतून जात असताना बिबट्या रस्त्यात बसलेला पाहिला. गाडी जवळ गेल्यावरही तो ढिम्म हलला नाही. हा प्रकार प्रवाशांसाठी अत्यंत गंभीर असून वन विभागाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे
निखिल नारकर, (तालुका अध्यक्ष, युवा सेना)