

Charthana Shivai Bus inauguration
चारठाणा : अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रॉनिक प्रदूषणमुक्त 10 शिवाई बस परभणी जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. याचे श्रेय लाटण्यासाठी जिल्ह्यात राजकीय कलगीतुरा रंगला असला तरी शुक्रवारी ( दि. 19) उद्घाटन झाल्यानंतर हायकोर्ट नावाने पहिली शिवाय बस चारठाणा मार्गे धावली. चारठाणा येथील प्रवाशांकडून बसचे स्वागत करण्यात आले.
हायकोर्टसह विविध शासकीय कामे वेळेवर होण्याच्या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचण्यासाठी ही बस महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे. परभणी आगारातून सकाळी साडेपाच वाजता छत्रपती संभाजीनगर साठी जिंतूर मार्गे हायकोर्ट एक्सप्रेस मागील वर्षानुवर्षे धावत आहे. परंतु परभणी विभागातील सर्वच बसेसला अत्यंत वाईट दिवस आले असून 70 % च्या वर बसेस शेवटची घटका मोजत आहेत. तरीपण या बसेस रोडवर धावत आहेत.
हायकोर्ट एक्सप्रेस सुद्धा यापैकीच एक होती. त्यामुळे ही बस अनेक वेळा रस्त्यात बंद पडून संभाजीनगर येथे हायकोर्ट किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना वेळेवर न पोहोचल्यामुळे असुविधेला तोंड द्यावे लागत होते. तर वैद्यकीय उपचारासाठी जाणारे नागरिक वेळेवर न पोचल्यामुळे त्यांना परतण्यासाठी वेळ होत होता. कधी कधी तर त्यांना संभाजीनगर येथेच मुक्काम करावा लागत होता.
परंतु, नुकत्याच परभणी विभागासाठी सुमारे 10 अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त सर्व सोयी सुविधा उपलब्ध इलेक्ट्रॉनिक असलेल्या शिवाई बसेस उपलब्ध झाल्या असून जिल्ह्याचे खासदार व पालकमंत्री यांच्यात सदर बसेस उपलब्ध करण्याचा श्रेय वाद मागील दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर चालू आहे. राजकीय श्रेयवाद काहीही असला तरी परभणी जिल्ह्यासाठी दहा वातानुकूलित शिवाई बस उपलब्ध झाल्या आहेत.
पहिली शिवाई बस परभणी छत्रपती संभाजी नगर हायकोर्ट नावाने जिंतूर, चारठाणा मार्गे धावली. ही बस चारठाणा फाटा येथे आगमन होताच नागरिकांतून आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी बसचे स्वागत करण्यात आले. बस सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.