

जत : आई आणि मुलाच्या नात्यातील भावनिक जिव्हाळ्याचे हृदयद्रावक दर्शन घडविणारी घटना जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे घडली. 107 वर्षीय वृद्ध मातेच्या निधनानंतर, हा विरह सहन न झाल्याने अवघ्या सहा तासांतच त्यांच्या सुभेदार पुत्राचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
वाळेखिंडी येथील सत्वशीला रंगराव शिंदे (वय 107) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच, भारतीय सैन्य दलातून सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झालेले त्यांचे पुत्र औदुंबर रंगराव शिंदे (वय 53) यांना मोठा मानसिक धक्का बसला. मातेच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच औदुंबर यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने सांगली येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालविली.
गाव शोकसागरात
माजी सुभेदार औदुंबर शिंदे यांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली. आई आणि मुलावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ शिंदे कुटुंबावर आली. औदुंबर शिंदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ आणि सात बहिणी असा परिवार आहे.
देशसेवेचा वारसा
औदुंबर शिंदे यांनी भारतीय सैन्य दलात 28 वर्षे सेवा बजावून सुभेदार पद भूषविले होते. एक शिस्तप्रिय आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. सेवानिवृत्तीनंतरही ते गावातील तरुणांना सैन्य भरतीसाठी मार्गदर्शन करीत होते. तासगाव येथील सैनिक शाळेत व्यवस्थापक म्हणून काम करतानाच, एनसीसीच्या माध्यमातून त्यांनी अनेक युवकांना देशसेवेसाठी प्रेरित केले.