

Bangladesh Crisis Explained: दक्षिण आशियाच्या राजकारणात बांगलादेश हा नेहमीच केंद्रस्थानी राहिलेला आहे. 1971 च्या मुक्ती संग्रामापासून ते आजपर्यंत बांगलादेशच्या परराष्ट्र धोरणाचा परिणाम भारत, पाकिस्तान आणि संपूर्ण उपखंडावर होत आला आहे. गेल्या काही महिन्यांत बांगलादेशात जे घडत आहे, ते केवळ अंतर्गत राजकारणापुरते मर्यादित नाही. यामागे आंतरराष्ट्रीय संबंधही कारणीभूत आहेत. रस्त्यांवर लागलेली आग, तरुणांचा संताप, माध्यमांवरील हल्ले, भारताविरोधी घोषणा आणि पाकिस्तानशी संबंधित गुप्त हालचाली, या सगळ्यांचा एकमेकांशी संबंध आहे. या सगळ्याची सुरुवात झाली ती शरीफ उस्मान हादीपासून.
ढाक्यातील मध्यवर्ती भागात प्रचारासाठी निघालेल्या हादी याच्यावर भरदिवसा गोळीबार झाला. तो रिक्षातून जात असताना, हेल्मेट घातलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळी झाडली. डोक्यात गोळी लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि उपचारासाठी त्याला सिंगापूरला हलवण्यात आलं. सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्याचा मृत्यू झाला. या एका घटनेनं बांगलादेशातील संताप उफाळून आला. लोकांना असं वाटू लागलं की, जर तरुण नेत्यालाच रस्त्यावर गोळ्या घालून ठार केलं जात असेल, तर सामान्य माणूस सुरक्षित आहे का?
शरीफ उस्मान हादी हा सामान्य राजकीय नेता नव्हता. तो गेल्या वर्षी झालेल्या युवक आंदोलनातून पुढे आलेला चेहरा होता. या उठावात तरुणांनी रस्त्यावर उतरून रोजगार, न्याय आणि राजकीय बदलांची मागणी केली होती. हादी त्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनला होता. त्याने ‘इन्किलाब मंच’मधून राजकीय प्रवासाला सुरुवात केली आणि थेट संसद निवडणुकीत उतरायचं ठरवलं.
ढाका विद्यापीठात शिक्षण घेतलेला, पण पारंपरिक राजकारणावर विश्वास न ठेवणारा हा तरुण सत्ताधारी अवामी लीगवरही टीका करत होता आणि विरोधी पक्षांनाही प्रश्न विचारत होता. त्याने ढाकातील मतदारसंघातून स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे तो राजकीय पक्षांसाठी अडचणीचा ठरत होता.
काही स्थानिक अहवालांमध्ये, कोणताही ठोस पुरावा नसताना, हल्लेखोर भारतीय असल्याचे किंवा त्यांना भारताची मदत असल्याचे आरोप करण्यात आले. मात्र पोलिस तपासात वेगळे चित्र समोर आले आहे.
बांगलादेशातील प्रसिद्ध वृत्तपत्र प्रथम आलोनुसार, पोलिसांनी तीन संशयितांची ओळख पटवली आहे. हे तिघेही अवामी लीगशी संबंधित संघटनांशी संबंधित असल्याचा आरोप आहे. मुख्य आरोपीचे नाव फैसल करीम मसूद असून, तो पूर्वी बंदी घालण्यात आलेल्या छात्र लीगचा नेता होता. तपास यंत्रणांच्या मते, ही हत्या पूर्वनियोजित होती आणि देशात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण करण्याचा उद्देश त्यामागे होता.
हत्येनंतर संतप्त जमाव रस्त्यावर उतरला. या आंदोलकांनी काही वृत्तवाहिन्यांची आणि वर्तमानपत्रांची कार्यालयं पेटवली. यामागे केवळ हिंसक भावना नव्हती, तर प्रचंड नाराजी होती. आंदोलकांचा आरोप होता की, काही माध्यमं सरकारची बाजू घेत आहेत आणि हत्येमागील सत्य लपवत आहेत. सरकारशी जवळीक असलेल्या माध्यमांवरचा लोकांचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे.
सध्या बांगलादेशात नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार आहे. सरकारने हत्येचा निषेध केला असून चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. लष्कराने थेट हस्तक्षेप न करण्याची भूमिका घेतली आहे. “आम्ही लोकशाही प्रक्रियेला पाठिंबा देतो” असं लष्कर म्हणत असलं, तरी परिस्थिती हाताबाहेर गेली तर लष्कर पुन्हा हस्तक्षेप करु शकतं, ही भीती कायम आहे.
या सगळ्या घडामोडींमध्ये पाकिस्तानच्या ISI च्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. थेट पुरावे नसले तरी गुप्तचर अहवालात धक्कादायक माहिती समोर येत आहे. ढाक्यात ISI चा सेल सक्रिय असल्याचे तसेच पाकिस्तानशी संबंधित काही व्यक्ती परिसरात असल्याचे संकेत मिळत आहेत. धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कट्टर विचार पसरवले जात असून काही गटांना आर्थिक मदत दिली जात असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे हा संताप नैसर्गिक आहे की मुद्दाम घडवून आणला आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे.
काही अहवालांनुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये बांगलादेशात निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ISI भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या गटांना आर्थिक मदत करत असल्याचे आरोप आहेत. पाकिस्तानला बांगलादेशात आपल्या मर्जीनुसार सरकार आणायचे आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तानला बांगलादेशमध्ये नेमकं काय हवं आहे, हे पाहिलं तर चित्र अधिक स्पष्ट होतं. भारताला कोंडीत पकडणं, भारताविरोधी वातावरण तयार करणं आणि बांगलादेशमध्ये आपला प्रभाव वाढवणं, हा पाकिस्तानचा डाव आहे. पाकिस्तान सध्या अडचणीत आहे. कारण अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, दहशतवादाचा शिक्का कायम आहे आणि भारताशी थेट संघर्ष करणं शक्य नाही. अशात बांगलादेश भारतापासून दूर गेला, तर पाकिस्तानसाठी हा मोठा धोरणात्मक विजय असेल. इतिहास पाहिला तर पाकिस्तानने नेहमीच बांगलादेशला भारताविरोधात वापरण्याचा प्रयत्न केला आहे.
याच कारणामुळे भारतासाठी बांगलादेश अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताच्या पूर्व सीमेची सुरक्षा, ईशान्य भारताचा संपर्क, दहशतवादविरोधी सहकार्य आणि व्यापार, यामुळे भारताला बांगलादेशशी संबंध चांगले ठेवणे गरजेचे आहे. बांगलादेश अस्थिर झाला, तर त्याचे पडसाद थेट भारतात उमटू शकतात.
या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही भूमिका स्पष्ट केली आहे. बांगलादेशात शांततेत आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात, अशी भारताची भूमिका आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, बांगलादेशातील काही कट्टरपंथी गट खोटी माहिती पसरवत आहेत आणि भारत याचा निषेध करतो. तसेच, बांगलादेश सरकारने या घटनांबाबत ठोस तपास न केल्याबद्दलही भारताने नाराजी व्यक्त केली आहे. याच कारणामुळे काही ठिकाणी व्हिसा सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीनेही इशारा दिला आहे की, बांगलादेशातील सध्याची परिस्थिती 1971 नंतर भारतासाठी सर्वात मोठे धोरणात्मक आव्हान ठरू शकते.
दरम्यान, माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारत बांगलादेशला परत पाठवणार का, हा प्रश्नही चर्चेत आहे. सध्या तरी भारत असा निर्णय घेणार नाही, असं चित्र आहे. सध्या बांगलादेशातील न्यायप्रक्रियेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहे. त्यामुळे हा विषय अतिशय सावधपणे हाताळला जात आहे.
बांगलादेशातील Bangladesh Crisis Explained:Bangladesh Crisis Explained:काही अभ्यासकांचे म्हणणे आहे की, कट्टरपंथी गटांना मिळणारे राजकीय पाठबळ देशाला अस्थिरतेकडे नेत आहे. भारताच्या सीमेजवळील या घडामोडी प्रादेशिक शांततेसाठी धोकादायक ठरू शकतात.
एकंदरीत पाहिलं तर बांगलादेश सध्या अत्यंत नाजूक टप्प्यावर उभा आहे. तरुणांचा संताप, राजकीय अस्थिरता आणि शेजारील देशांचा हस्तक्षेप वाढत असल्यामुळे परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. ही आग वेळीच आटोक्यात आली नाही, तर त्याचे परिणाम केवळ बांगलादेशपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर संपूर्ण दक्षिण आशियाला त्याची झळ पोहोचू शकते.