

Electric shock Shahada
नंदुरबार: ट्रकची ताडपत्री नीट करण्यासाठी छतावर चढलेल्या सहचालकाला उच्च दाबाच्या वीज वाहिनीचा जोरदार धक्का लागल्याची धक्कादायक घटना शहादा तालुक्यातील जावदा येथे घडली. या दुर्घटनेत सहचालक गंभीररीत्या भाजला असून, निष्काळजीपणा केल्याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालक सोहेल रशिद खान (रा. बडवाणी) हा आपला ट्रक (क्रमांक MP-13 H-0245) घेऊन जावदा गावातील भमरटा चौफुलीवरून जात होता. यावेळी ताडपत्रीचा पाईप व्यवस्थित करण्यासाठी त्याने सहचालक इसरान रेहमान शेख याला ट्रकच्या छतावर चढण्यास सांगितले. ज्या ठिकाणी ट्रक उभा होता, त्यावरून विजेच्या तारा गेल्या होत्या. इसरानने लोखंडी पाईप उचलताच तारांमधील विद्युत प्रवाह त्याच्या शरीरात उतरला. यात तो चेहऱ्यापासून पायापर्यंत गंभीररीत्या भाजला गेला.
या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत करत इसरानला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी इकबाल शेख रहेमान शेख यांनी फिर्याद दिली आहे. वरून विजेच्या तारा जात असल्याचे माहित असतानाही चालकाने सहचालकाला जाणीवपूर्वक वर चढण्यास भाग पाडले, असा ठपका ठेवण्यात आला आहे. या फिर्यादीवरून म्हसावद पोलिसांनी चालक सोहेल खान याच्यावर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.