IND vs NZ 3rd T20 : टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू संकटात, दुसरा सामना जिंकूनही… | पुढारी

IND vs NZ 3rd T20 : टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू संकटात, दुसरा सामना जिंकूनही...

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs NZ 3rd T20 : टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी-20 सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली असली तरी भारतीय फलंदाजांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. विशेषत: गोलंदाजांनी लखनऊमध्ये चांगली कामगिरी करत न्यूझीलंडला 99 धावांत रोखले, पण या कमी धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतानाही भारतीय संघाला घाम फुटला. भारताने एक चेंडू राखून कसाबसा सामना जिंकला.

लखनऊमधील खेळपट्टी दोन्ही संघांच्या फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरली. पण सामना जिंकण्याच्या शर्यतीत टीम इंडियाला न्यूझीलंडपेक्षा अधिक चांगल्यारितीने फिरकी खेळण्याची अपेक्षा होती. भारतासमोर केवळ 100 धावांचे लक्ष्य होते, त्यावेळी भारतीय संघ किमान 15 षटकांत सामना जिंकेल असे वाटत होते, परंतु भारताची सलामीची जोडी पुन्हा एकदा कुचकामी ठरली. शुभमन गिलला टी-20 मध्ये त्याचा वन-डे फॉर्म कायम ठेवता आला नाही, तर इशान किशनलाही निर्भयपणे फलंदाजी करताना दिसला नाही. त्यामुळे या दोघांपैकी एकाला तिस-या आणि शेवटच्या टी-20 सामन्यातून वगळले जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. (IND vs NZ 3rd T20)

इशान-शुभमन जोडी दोन्ही टी-20 मध्ये अपयशी

ईशान किशन आणि शुभमन गिल यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या सलग दोन टी-20 सामन्यात टीम इंडियासाठी डावाची सुरुवात केली. परंतु आतापर्यंत या दोघांनी एकदाही आश्वासक फलंदाजी केलेली नाही. पहिल्या सामन्यात या दोघांमध्ये केवळ दहा धावांची भागीदारी झाली. त्यावेळी पहिल्यांदा इशान किशन बाद झाला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात शुभमन गिल आपली विकेट देऊन तंबूत परतला. यावेळीही दोघांना 17 धावांची सलामी देता आली. म्हणजेच एकदाही या दोघांना अर्धशतकी भागीदारी पर्यंत मजल मारता आलेली नाही.

राहुल त्रिपाठी दोन्ही सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर मैदानात उतरला. सुरुवात डळमळीत झाली असताना त्यानेही जबाबदारीपूर्वक फलंदाजी करायची सोडून चूकीचे फटके खेळून विकेट गमावली. कमी अनुभव हे त्या मागचे कारण असू शकते, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सुरुवातीच्या विकेट लवकर पडल्याने कर्णधार हार्दिक पंड्या आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यावर आपसूकच ताण पडतो.

रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्यांच्या बॅटने अपेक्षेप्रमाणे काम केले नाही, त्यामुळे सामना हाताबाहेर गेला. मात्र दुसऱ्या सामन्यात दोघांनीही डाव सांभाळत टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. दरम्यान, तब्बल दीड वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करणारा सलामीवीर पृथ्वी शॉ बेंचवर बसले आपण पाहतोय. आता तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात पृथ्वीचे पुनरागमन होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

तिसऱ्या टी-20 सामन्यात पृथ्वीला संधी

पृथ्वी शॉने जुलै 2021 मध्ये पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. हा त्याचा पहिला आणि आतापर्यंतचा शेवटचा सामना आहे. कर्णधार हार्दिक पंड्याने मालिकेपूर्वीच स्पष्ट केले होते की शुभमन गिल आणि इशान किशन डावाची सुरुवात करतील. अशा परिस्थितीत पृथ्वीला संधी नव्हती. शेवटचा सामना हा मालिकेचा निर्णायक सामना आहे. त्यामुळे हा सामना खूप खास असणार आहे.

अशा स्थितीत पृथ्वी सलामीवीर म्हणून पुनरागमन करू शकेल, असे मानले पाहिजे. पण बाहेर कोण असेल? शुभमन गिल किंवा राहुल त्रिपाठी या दोघांपैकी एकाला बाहेर बसावे लागू शकते, असे समजते. जर पृथ्वीने इशान किशनसोबत डावाची सुरुवात केली, तर शुभमन गिलही तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो, अशावेळी राहुल त्रिपाठीला कट्ट्यावर बसावे लागेल. पण त्रिपाठीला तिसऱ्या क्रमांकावर ठेवल्यास प्लेइंग इलेव्हनमधून शुभमन गिलचा पत्ता कट केला जाईल. इशान किशन डच्चू देण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण तो यष्टिरक्षकही आहे. भारतीय संघात विकेटकीपिंग करणारा जितेश शर्माही असला, तरी इशान ऐवजी त्याला प्राधान्य दिले जाईल, अशी शक्यता फारच कमी आहे.

Back to top button