‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रिम्स’ला सुवर्णमयूर; चिरंजीवींचा सन्मान | पुढारी

‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रिम्स’ला सुवर्णमयूर; चिरंजीवींचा सन्मान

पणजी : पिनाक कल्लोळी – भारताच्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) प्रतिष्ठेचा सुवर्ण मयूर पुरस्कार व्हॅलेंटीना माउरेल दिग्दर्शित ‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रिम्स’ चित्रपटाने पटकावला, तर यंदाचे ‘आयसीएफटी-युनेस्को गांधी’ पदक पयाम एकानदारी दिग्दर्शित ‘नारगेसी’ या चित्रपटाला मिळाले.

येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सोमवारी सायंकाळी महोत्सवाची सांगता झाली. या सोहळ्यात रंगारंग कलाविष्कारासह विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सोहळ्यास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, या खात्याचे राज्यमंत्री एल. मुरुगन, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी उपस्थित होते. या सोहळ्यात आशा पारेख, अक्षय कुमार, आयुषमान खुराना, मनुषी चिल्लर, प्रसूनजीत चॅटर्जी, राणा दुगाबत्ती , इशा गुप्ता आणि शर्मन जोशी या कलावंतांना सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी 53 व्या इफ्फीचा धावता आढावा घेतला. ते म्हणाले, यंदाच्या इफ्फीत आम्ही करमणुकीसोबत मास्टरक्लासद्वारे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. प्रतिभा असेल तर चित्रपटाला स्थानिकतेचे बंधन राहात नाही. तो देशभर नव्हे तर जगभर पोहोचतो.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, गोव्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पोस्ट प्रोडक्शन व अन्य कामांसाठी चित्रपट सृष्टीने गोव्यात यावे. मनोरंजन संस्थेने कोव्हिडनंतर चांगल्या प्रकारे महोत्सवाचे आयोजन केले. यावेळी त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये मोलाची कामगिरी केलेल्या गोमंतकीय कलाकारांचे आभार मानले.

पहिला चित्रपट कायम लक्षात : आशा पारेख

‘दिल देके देखो’ हा माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मला खूप आनंद झाला होता. तो दिवस मला आजही आठवतो. तो कायम लक्षात राहील. सध्या दीपिका पदुकोण ही अभिनेत्री मला चांगली वाटते, असे मनोगत आशा पारेख यांनी व्यक्त केेले.

पुरस्कारप्राप्त विजेते

सर्वोत्कृष्ट चित्रपट : आय हॅव इलेक्ट्रिक ड्रिम्स (बेल्जियम, फ्रान्स आणि कोस्टा रिका)
उत्कृष्ट दिग्दर्शक : नादेर सॅव्हीआर ( नो एन्ड ), तुर्कस्तान
उत्कृष्ट अभिनेता : वाहिद मबाशेरी ( नो एन्ड )
उत्कृष्ट अभिनेत्री : डॅनीएला नावारो (आय हॅव इलेक्ट्रिक ड्रिम्स)
विशेष जुरी – लव डिएझ ( व्हेन दि वेव्हस आर गॉन )
उत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: अस्मिना प्रोद्रोव (बिहाईंड दि हेस्टक )
आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक : नारगेसी

Back to top button