पंढरपूरचे अभिजीत पाटील ऐन निवडणुकीत भाजपच्या वाटेवर | पुढारी

पंढरपूरचे अभिजीत पाटील ऐन निवडणुकीत भाजपच्या वाटेवर

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : माढा मतदार संघातील पंढरपूर तालुक्याचे राजकारण बदलताना दिसत आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडून भाजपाचे कमळ हाती घेण्याची चर्चा सुरू आहे. आमचं ठरले आहे म्हणत अभिजित पाटील यांचे कार्यकर्ते भाजप बरोबर जाण्यातच भले असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे अभिजित पाटील हे शरद पवार यांची साथ सोडून भाजपाशी घरोबा करण्याच्या तयारीत आहेत.

विठ्ठल कारखान्यावर 430 कोटीची थकबाकी वसुलीबाबत राज्य सहकारी बँकेकडून झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाटील हा निर्णय घेत असल्याची चर्चा आहे. शनिवारी (दि.27) सकाळी शरद पवार यांच्यासोबत विठ्ठल मंदिरात असणारे पाटील हे संध्याकाळी कमळ हाती घेण्याची शक्यता आहे. असे झाले तर निश्चितच महाविकास आघाडीला तसेच शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर नुकतीच राज्य सहकारी बँकेने कारवाई केली. त्यावेळी अभिजीत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत करमाळ्याच्या सभेत होते. या सभेतून अभिजीत पाटील यांनी वॉकआऊट करत थेट कारखाना गाठला. शुक्रवारी संध्याकाळी पंढरपुरातील शरद पवारांच्या सभेतही अभिजीत पाटील अस्वस्थ दिसले. केवळ पंढरपूरच्या विकासावर ते बोलले.

इतर कुठलीही राजकीय भाषा अभिजीत पाटील यांनी वापरली नाही. अशातच कारखान्याचे चेअरमन असणाऱ्या अभिजीत पाटील यांच्या संचालक मंडळाने आता त्यांना थेट भाजपामध्ये प्रवेश करू, असा कारखाना कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत ठराव केला आहे. पाटील हे भाजप मध्ये गेले तर कारवाई टळू शकते. पाटील यांचा देखील छुपा राजकीय ओढा भाजपाकडे आहे. अशा स्थितीत पाटील हे शरद पवारांचा हात सोडू शकतात.

हेही वाचा :

Back to top button