नाशिक : बिबट्याचा मोर्चा पोल्ट्रीकडे; 200 कोंबड्या केल्या फस्त | पुढारी

नाशिक : बिबट्याचा मोर्चा पोल्ट्रीकडे; 200 कोंबड्या केल्या फस्त

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
बिबट्याने एका पोल्ट्री फार्मची जाळी तोडून आत प्रवेश करत 200 कोंबड्या फस्त केल्याची घटना तालुक्यातील कासारवाडी परिसरात रविवारी (दि.27) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

कासारवाडी येथे वैभव चंद्रकात देशमुख यांचे 5 हजार कोंबड्यांचे पोल्ट्रीशेड आहे. महिनाभरापूर्वीच त्यांनी पोल्ट्रीत कोंबड्या टाकल्या होत्या. सद्यस्थितीत कोंबड्यांचे वजन दीड किलोच्या आसपास आहे. रविवारी रात्री बिबट्याने पोल्ट्रीफार्मची जाळी तोडून आत प्रवेश करीत कोंबड्यांवर हल्ला केला. कोंबड्या प्रचंड भेदरल्याने सैरावैरा पळू लागल्या. बिबट्याने यात अनेक कोंबड्या फस्त करत तेथून पोबारा केला. कोंबड्याचा आवाज कानी पडल्यानंतर शेजारीच राहत असलेले देशमुख जागे झाले. त्यांनी जवळ येऊन पाहिले असता अनेक कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले. यात पोल्ट्रीमधील जवळपास 200 कोंबड्या मृत पावल्या आहेत. कासारवाडी परिसरातील पाळीव प्राण्यांवर बिबट्याकडून हल्ले होत असल्याचे प्रमाण वाढले असतानाच आता बिबट्याने थेट पोल्ट्रीमध्ये शिरून कोंबड्यांना लक्ष्य केल्याने पोल्ट्रीधारक धास्तावले आहेत. या घटनेने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये दहशत पसरली असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजर्‍याची तरतूद केली जात असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्ता देशमुख, अनिल देशमुख, नंदू देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष नीलेश देशमुख, शुभम लोकरे, मोरया मित्रमंडळाचे अध्यक्ष मनोज जगताप, चंद्रकांत देशमुख, सोमा साळुंखे, लवेश साळुंखे उपस्थित होते.

लाखाचे नुकसान; भरपाईची मागणी
सकाळी ग्रामस्थांना याबाबत माहिती कळाल्यानंतर माजी उपसरपंच सचिन देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यांनी वनविभागाला घटनेची माहिती देत तत्काळ पंचनामा करण्याची मागणी केली. वनविभागाचे कर्मचारी आकाश रुपवते यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. या घटनेत देशमुख यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून, तत्काळ नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा मुक्त वावर दिसून येत असल्याचे शेतकरी सांगत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे नागरिकांना जिकिरीचे झाले आहे.

हेही वाचा :

Back to top button