नाशिक : पुलावर चुकतो काळजाचा ठोका; संरक्षक कठडाही तुटला | पुढारी

नाशिक : पुलावर चुकतो काळजाचा ठोका; संरक्षक कठडाही तुटला

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
‘विद्यार्थी घडे, पण त्यासाठी मृत्यूशी रोज गाठ पडे, मिळतात लालफितीच्या कारभाराचे धडे!’ अशी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अवस्था झाल्याचा सूर उमटत आहे. शहराबाहेरील महाविद्यालयात ये-जा करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आरम नदीवरील धोकादायक पुलाकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष यास कारणीभूत ठरले आहे.

2011 मध्ये सटाणा येथे बसखाली चिरडून अपघातात सारिका भावसार नामक युवतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतरदेखील अपघाताची मालिका सुरूच असून, 14 ऑक्टोबर 2022 रोजी ‘मविप्र’च्या सटाणा महाविद्यालयातील एक विद्यार्थिनी घरी परतत असताना जिजामाता उद्यानाजवळ अपघातात जागीच ठार झाली. पुलाचा फुटपाथ गवत व घाणीचे साम्राज्य यामुळे व्यापला असल्याने चालण्यास जागा नसल्याने नाहक ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून तिला आपला जीव गमवावा लागला होता. अपघातानंतर तीन दिवसांनी पुलावरील गवत काढण्याची तत्परता दिसून आली होती. मात्र, फुटपाथची उंची न वाढवल्याने पावसाचे पाणी साठणे तसेच त्यात डुकरांचे ठाण हे प्रश्न प्रशासनाकडून सोडविणे बाकी होते. यानंतरदेखील पुन्हा या पुलावर भयंकर अपघात झाला व पुलाचे बॅरिकेड तुटून वाकले आहेत. परिणामी फुटपाथ पुन्हा जवळपास बंद झाला आहे. सटाणा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुन्हा बसस्थानकाकडे बस पकडण्यासाठी याच अरुंद व जीवघेण्या पुलावरून पायी जावे लागत आहे. कोट्यवधी रुपये नागरी हितासाठी खर्च करणारे प्रशासन देशाचे भविष्य असलेल्या मुलांना साधे चालण्यासाठी रस्ता देऊ शकत नाही. लालफितीच्या कारभारात अडकलेले प्रशासन वर्तमानात रोज मृत्यूचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांना रोज अपघात होताना पाहण्याचे हे ‘फ्री ट्रेनिंग’ देतेय, अशी चर्चा होते आहे.

‘मांडवली’चा औषधोपचार वरिष्ठाची शिकवणी !
अतिक्रमणाने अरुंद झालेल्या रस्त्यावर अवजड वाहने उभी असली तरी पोलिस कुठलीच कार्यवाही करीत नाही. अपघात झाला तर अपघातग्रस्ताच्या औषचोपचाराचा खर्च वाहनचालकाने उचलायचा व कागदपत्रे नाहीत वा अपघात झाला असा कुठलाही गुन्हा गंभीर नोंदवायचा नाही, अशी जणू सटाण्यात ‘वरिष्ठाची शिकवणी’ असल्याचे विद्यार्थी बोलतात. थोडक्यात पोलिस कार्यवाही नव्हे तर ‘मांडवली’चा औषधोपचार व ‘वरिष्ठाची शिकवणी’ हादेखील धडा विद्यार्थी घेत आहेत.

दररोज जीव मुठीत घेत पूल पार करताना आपणदेखील अश्विनीसारखे चिरडले जाणार का, असा विचार रोज येता-जाताना आल्यावाचून राहत नाही. काळजीपोटी काळजात धस्स होते. मग आमचे प्रश्न, आमचा आवाज कुणी तरी ऐकेल का? – निकिता पवार, विद्यार्थिनी.

हेही वाचा:

Back to top button