Pune News : मध्यवर्ती इमारतीमधील फोन वाजतो, पण आवाज जात नाही! | पुढारी

Pune News : मध्यवर्ती इमारतीमधील फोन वाजतो, पण आवाज जात नाही!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारची आयुक्तालय दर्जाची व अन्य सर्व महत्त्वपूर्ण कार्यालये असलेल्या येथील मध्यवर्ती इमारतीमधील (सेंट्रल बिल्डिंग) भ—मणध्वनी सेवा कोलमडल्याने अनेक समस्यांचा सामना अधिकारी-कर्मचार्‍यांना करावा लागत आहे. शिवाय इंटरनेटसेवाही विस्कळीत झाल्याने दैनंदिन कामात अडथळे येऊन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात अडचणी वाढत आहेत. त्यामुळे मोबाईल टॉवर अथवा नेटवर्क बूस्टरची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्य सरकारचा सार्वजनिक कृषी आयुक्तालय, पोलिसांची महत्त्वपूर्ण कार्यालये, वन विभाग, सहकार आयुक्तालय, पणन संचालनालय, शिक्षण आयुक्तालय, अन्नधान्य वितरण कार्यालये, पणन संचालनालयासह महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय कार्यालये मध्यवर्ती इमारतीमध्ये आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयावर असलेला एका मोबाईल कंपनीचा टॉवर काढून टाकण्यात आल्यापासून भ—मणध्वनी यंत्रणा कोलमडल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

मध्यवर्ती इमारतीशेजारील अन्य खासगी कार्यालयांमध्येही नेटवर्कअभावी संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यभरातील शेतकरी आणि सामान्य नागरिक हे मध्यवर्ती इमारतींमधील कार्यालयात संपर्क साधत असतात. मात्र, सर्वाधिक वापरात असलेली भ—मणध्वनी यंत्रणा कोलमडली आहे. इंटरनेटसेवेतही बिघाड असल्याने येथील कार्यालयांनी संबंधित कंपन्यांना पत्र देऊन सुधारणा करण्यासाठी पत्रेही दिले आहेत. मात्र, संपर्क करण्यातील यंत्रणा पूर्ववत होत नसल्याचे चित्र असल्याने वरिष्ठ अधिकारीही त्रासले आहेत.

गैरसमज होण्याचेही प्रकार

मंत्रालयस्तरावरून अगदी मंत्र्यांपासून सचिव दर्जाचे अधिकारी येथील विविध आयुक्तालयांमध्ये संपर्क साधतात. मात्र, भ—मणध्वनी वाजला तरी येथून बोलणार्‍या अधिकार्‍यांचा आवाजच त्यांना जात नाही. त्यामुळे अनेकदा गैरसमजही झाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे नेटवर्कची समस्या कधी मिटणार? असा प्रश्न सर्वांनाच पडल्याचे एका आयुक्तांनीच सांगितले.

हेही वाचा

इस्रायलपुढे आव्हान भुयारांचे

उत्पादन शुल्क विभागाची तीन वर्षांत कोटींची उड्डाणे

अर्थज्ञान : भविष्य निर्वाह निधीचा पैसा काढताना कर लागतो का?

Back to top button