ग्रीन टी आणि ब्लॅक टीमधील फरक माहितीय का? जाणून घ्‍या फायदे आणि तोटे… | पुढारी

ग्रीन टी आणि ब्लॅक टीमधील फरक माहितीय का? जाणून घ्‍या फायदे आणि तोटे...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चहा या शब्‍दाने बहुतांश जणांच्‍या दिवसाची सुरुवात होते. चहा आपल्‍या जगण्‍यातील एक अविभाज्‍य घटक झाला आहे. त्‍यामुळे त्‍याचे स्‍थान लोकप्रिय पेयांमध्‍ये नेहमीच अग्रस्‍थानी राहिले आहे. मागील काही वर्षांपासून दूधयुक्‍त चहापेक्षा ब्‍लॅक टी किंवा ग्रीन टी घेण्‍याचे प्रमाण वाढत आहे. ग्रीन टी आणि ब्लॅक टी दोन्ही कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीच्या पानांपासून बनवले जातात. हे दोन्ही चहाचे प्रकार दूध न मिसळता प्यायले जातात. ( Black Tea and Green Tea) ग्रीन टी आणि ब्लॅक टीमध्ये नेमका काय फरक आहे? याचे आपल्या आरोग्यासाठीचे फायदे आणि तोटे याविषयी जाणून घेवूया…

Black Tea and Green Tea : ग्रीन टी आणि ब्लॅक टी म्हणजे काय ?

ग्रीन टी आणि ब्लॅक टी यातील फरक त्‍याच्‍या रंगावरील नावानेच स्‍पष्‍ट होतो. ग्रीन टी हिरवा आणि तर ब्‍लॅक टी काळा दिसतो. हे दोन्ही चहा कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीच्या पानांपासून बनवले जातात. ग्रीन टीसाठी वापरल्‍या जाणार्‍या हिरव्या चहाच्या पानांना आंबवले जात नाही आणि ऑक्सिडेशन प्रक्रियेतून ती काढली जात नाहीत. तर ब्‍लॅक टीसाठीच्‍या चहाची पाने प्रथम सुकवली जातात. यानंतर ऑक्सिडेशन प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी थेट हवेच्या संपर्कात ठेवली गेल्‍याने त्‍या पानांचा रंग काळा पडतो.

दोन्‍ही चहामधील मुख्य फरक

ग्रीन टी आणि ब्लॅक टीमधील मुख्य फरक म्हणजे ब्‍लॅक टीमध्‍ये ग्रीन टीपेक्षा जास्त कॅफिन असते. बाजारभावानुसार हिरवा चहा अधिक महाग असतो, तर काळा चहा यापेक्षा कमी दरात उपलब्ध होतो. ब्‍लॅक टीमध्‍ये आम्लाचे प्रमाण अधिक असते तर ग्रीन टीमध्ये त्याचे प्रमाण उपयुक्त असते.ग्रीन टी नॉन-ऑक्सिडाइज्ड आहे तर ब्लॅक टी ऑक्सिडाइज्ड आहे.

शरीराला होणारे फायदे

मागील काही वर्षांपासून वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी आणि ब्लॅक टीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याशिवाय शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते. या दाेन्‍ही प्रकारच्‍या चहा प्याल्‍याने  आपल्याला ताजेतवाने वाटते. फिटनेसबद्दल जागरूक असलेले बहुतेक लोक सामान्य चहाऐवजी फक्त ग्रीन टी आणि ब्लॅक टी घेतात. याशिवाय ग्रीन टी आपल्याला हृदयविकारांशी लढण्यास मदत करते, रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते, असेही संशाेधनात स्‍पष्‍ट झाले आहे. तर ब्लॅक टी आपल्या शरीराला एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.

Black Tea and Green Tea : शरीरावर हाेणारे तोटे

कोणत्‍याही गोष्‍टीचा अतिरेक हा घातकच. त्‍या प्रमाणे ग्रीन टी आणि ब्लॅक टीचे अतिसेवन हे शरीरासाठी अपायकारक ठरते. या दोन्‍ही प्रकराच्‍या चहांचे अतिसेवन शरीरावर परिणाम करेत. त्‍यामुळेच अशक्तपणा, छातीत जळजळ होण्‍याचा त्रास असणारे, मायग्रेन, मानसिक विकार असणार्‍यांनी या चहाचा वापर टाळावा, असा सल्‍ला डॉक्‍टर देतात.

हेही वाचा : 

 

 

Back to top button