Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंनी संकुचित मानसिकता दाखवली ! बावनकुळेचा टोला | पुढारी

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंनी संकुचित मानसिकता दाखवली ! बावनकुळेचा टोला

नागपूर पुढारी वृत्तसेवा: उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्‍या नावाने मते घेतली. मात्र अडीच वर्षात त्यांना विधिमंडळात शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र लावता आले नाही. सोमवारी ( दि. 23 ) विधिमंडळात तैलचित्र लावण्याचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थिती लावली नाही. यानिमित्ताने त्यांनी संकुचित मानसिकता दाखवली, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज ( दि. २४ ) माध्यमांशी बोलताना केली.

मी पक्षाला कुलूप लावेन;  पण काँग्रेससोबत जाणार नाही, असे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी सांगितले होते. तरीही उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी आघाडी केली. स्वातंत्र्यवीर वि. दा सावरकरांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेससोबत ते जाऊन बसले आहेत. याच माध्यमातून त्यांनी तत्वांशी तडजोड करीत अडीच वर्ष सत्तेचा उपभोग घेतला. सत्ता गेल्यापासून ठाकरे अस्वस्थ आहेत, असेही बावनकुळे म्‍हणाले.

विधान परिषदेच्या आम्ही लढत असलेल्या चारही जागा जिंकू, असा दावाही बावनकुळे यांनी केला. आम्हाला नागपूर, अमरावतीमध्ये चांगला प्रतिसाद असून, कोकणातही आम्ही मोठी मजल मारली आहे. तर नाशिकबद्दल निर्णय झालेला नसून, सत्यजित तांबे यांनी अद्याप भाजपकडे समर्थन मागितले नसल्याचेही बावनकुळे यांनी या वेळी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा कुठलाही परिणाम होणार नसून, ठाकरे यांनी भीमशक्तीशी नव्हे तर एका गटाशी युती केली आहे. ठाकरे यांचे कार्यकर्तेही या युतीमुळे नाराज असून, येत्या काळात अनेक कार्यकर्ते त्यांची साथ सोडतील, असा दावाही आमदार बावनकुळे यांनी पुन्हा एकदा केला.

हेही वाचा:

Back to top button