जिल्हा मजूर संघटना निवडणूक : मजूर संघाच्या अध्यक्षांचा आज फैसला | पुढारी

जिल्हा मजूर संघटना निवडणूक : मजूर संघाच्या अध्यक्षांचा आज फैसला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा मजूर संघटनेच्या 20 संचालक मंडळाची निवड होऊन पंधरा दिवस लोटले आहेत. या मंडळाच्या अध्यक्ष निवडीवर लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यातील आमदार खासदार यांनी संचालक निवडीच्या वेळी आणि आता अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मध्यस्थी केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

नांदगावचे आमदार सुहास कांदे, त्र्यंबकेश्वर-इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर तसेच माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जिल्ह्यातील धनवान संस्था म्हणून या संस्थेकडे बघितले जाते. या निवडणुकीसाठी मालेगावचे राजेंद्र भोसले आणि त्र्यंबकेश्वरचे संपतराव सकाळे यांनी आखाडे बांधण्यास सुरुवात केली असून, आज अध्यक्षच्या निवडीत संचालक कोणाच्या पारड्यात मत टाकतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान संचालकपदाच्या आठ जागा बिनविरोध झाल्यानंतर 12 जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. यात येवला, सिन्नर, देवळा, नाशिक, सुरगाणा, पेठ व चांदवड, ओबीसी, एससी, एसटी व महिलांच्या दोन जागांसाठी मतदान घेण्यात आले. एकूण 20 जागांपैकी आठ तालुका संचालक बिनविरोध निवडून आलेले असल्यामुळे त्यांनी थेट अध्यक्ष, उपाध्यक्षपद मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, जिल्हा मजूर संघटनेच्या निवडणुकीसाठी यंदा अनेकांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे सकाळे, भोसले आणि केदा आहेर यांनी पॅनल न बनविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राजेंद्र भोसले यांनी अप्रत्यक्षपणे पॅनल बनवत जवळच्या व्यक्तींनाच साथ दिली. त्यामुळे संपतराव सकाळे यांनी आपल्या गोटातील उमेदवार समोरासमोर उभे करत निवडणुकीत चुरस निर्माण केली होती. कृष्णा पारखे आणि अनिल आव्हाड यांनी साथ देत प्रचाराची जबाबदारी उचलली. याउलट केदा आहेर यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत ठाम राहत कोणत्याही प्रकारे पॅनल अथवा पाठिंबा जाहीर केला नाही. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी भोसले यांच्या पॅनलचे अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून शशिकांत उबाळे हे निवडून आले तर सकाळे यांच्या गटाचे ओबीसी प्रवर्गातून अर्जुन चुंभळे आणि एनटी गटातून राजाभाऊ खेमनार विजयी झाले. त्यामुळे अध्यक्षपदाच्या लढतीत हे दोन्ही गट समोरासमोर ठाकणार हे निश्चित झाले होते.

हेही वाचा:

Back to top button